World Sparrow Day : चिऊला देऊ हक्काचे घर

एमपीसी न्यूज – लहानपणी गोष्टी, गाणीतून आणि समोर चिमणी दाखवत घास भरवत आपली नाळ निसर्गाशी आई किंवा आजी जोडत असे. मनुष्यवस्तीत राहणारा सर्वसामान्य पक्षी चिमणी न पाहिलेला माणूस शोधूनही सापडणार नाही. परंतु या शतकाच्या सुरुवातीपासूनच जगभर विकासाचे वारे जोरात वाहू लागले. मानवी जीवनशैलीत झपाट्याने बदल झाले आणि शहरीकरण देखील प्रचंड प्रमाणात जगभर वाढू लागले. याचा सरळ परिणाम चिमणी सारख्या निरागस पक्ष्यांच्या संख्येवर मोठ्या प्रमाणात झाल्याचे अनेक देशात नोंदवले गेले.

यास आपला भारत देश देखील अपवाद नाही. खेडेगावात अजूनही निसर्गानुरुप जीवनशैली बर्यापैकी प्रमाणात टिकून असल्यामुळे चिमण्यांची संख्या स्थिर दिसत आहे. परंतु शहरात हे चित्र निराशाजनक आहे. मानवी विकासचक्रात आजपर्यंत अनेक प्राणी-पक्षी नामशेष झाले आहेत. यात चिमणीचा समावेश होऊ नये म्हणून फ्रांस येथील ‘इको-सिस एक्शन फाऊंडेशन’ व नाशिकची ‘नेचर फॉरएव्हर सोसायटी’ या संस्थांनी ऑगस्ट 2010 साली एकत्र येऊन दरवर्षी 20 मार्च हा ‘जागतिक चिमणी दिन’ म्हणून साजरा करण्याचे घोषित केले. तेव्हापासून जगभर ‘चिमणी दिन’ साजरा केला जात आहे.

शहरात पूर्वी वाडा संस्कृतीत चिमण्यांना घरट्यासाठी एखादा कोनाडा सहज मिळायचा. त्याजागी टोलेजंग इमारती उभ्या राहिल्या. त्यात चिमण्यांना घरटे करण्यास जागा मिळेनासी झाली आहे. काँक्रिटच्या जंगलात घरट्यासाठी चिमण्यांची वणवण होत आहे. वाढत्या प्रदुषणामुळे देखील चिमण्यांना पिल्लांना भरवण्यासाठी प्रथिनयुक्त अळ्या मिळेनासे झाले आहे.

पक्षी अभ्यासक व ‘अलाईव्ह’(पूर्वीचे स्वस्तिश्री)चे अध्यक्ष उमेश वाघेला यांनी अनेक वर्षे अभ्यास व अनेक प्रयोग करुन चिमणी व अन्य पक्ष्यांसाठी शास्त्रीय पद्धतीने घरटी डिझाईन केली आहेत. गेले 11 वर्षे अलाईव्ह संस्थेद्वारा ‘नेस्टबॉक्स – पक्ष्यांचे हक्काचे घर’ हा उपक्रम राबवण्यात येत आहे. नागरिकांनी आपल्या घर किंवा ऑफिसच्या परिसरात सुरक्षित ठिकाणी चिमण्यांसाठी ‘नेस्टबॉक्स’ दत्तक घेऊन लावल्याने चिमण्यांना घरट्यासाठी हक्काची जागा मिळेल. चिमणीच्या संवर्धनाला हातभार लागेल. नेस्टबॉक्स ना नफा ना तोटा या तत्वावर दत्तक घेण्यासाठी संपर्क उमेश वाघेला 9881101541.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.