World Test World Cup :   सर्व मदार कोहली, रहाणेवर….

एमपीसी न्यूज (विवेक कुलकर्णी) : ओव्हल मैदानावर सुरू असलेल्या कसोटी (World Test World Cup )अजिंक्यपदाचा विजेता भारत की ऑस्ट्रेलिया याचा निर्णय आज संध्याकाळपर्यँत स्पष्ट होईल.आजच्या दिवसभरातल्या 90 षटकात 280 धावा काढण्याचे शिवधनुष्य कोहली, रहाणे आणि उर्वरित भारतीय फलंदाजांना पेलवेल का हेच बघणे औत्सुक्याचे असणार आहे.444 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना कालच्या चौथ्या दिवशीचा खेळ समाप्त झाला तेंव्हा भारतीय संघाने 3 बाद 164 धावा केल्या असून कोहली 44 धावांवर तर रहाणे 20 धावांवर नाबाद आहेत.

त्याआधी ऑस्ट्रेलियन संघाने कालच्या 4 बाद 123 वरुन पुढे खेळायला सुरुवात केली असता उमेश यादवने लांबूशेनला लवकरच बाद करून भारतीय संघाला चांगली सुरुवात करून दिली खरी,पण त्यानंतर अलेक्स कॅरी आणि मिशेल स्टार्कने 93 धावांची भागीदारी करुन संघाला एकदम सुरक्षित अवस्थेत आणून ठेवले. कॅरीने शानदार खेळत सर्वच भारतीय गोलंदाजांना परेशान केले. त्याच्या खेळीमुळेच ऑस्ट्रेलियन संघाला 443 धावांची मोठी आघाडी मिळाली, स्टार्कनेही 41 धावांची उपयुक्त पारी खेळून आपले योगदान दिले,तो आणि कमिन्स बाद झाल्यानंतर ऑस्ट्रेलियन संघाने आपला डाव 8 बाद 270 धावसंख्येवर घोषित केला.

आज सकाळी खेळ सुरु झाल्यावर अगदी थोड्याच वेळात उमेश यादवने एका अप्रतिम आऊटस्विंगवर लाबूशेनला चकवले आणि स्लिप मध्ये उभे असलेल्या पूजाराने एक अप्रतिम झेल घेत लाबूशेनला वैयक्तिक 41 धावांवर तंबूत परत पाठवून भारतीय संघाला खुप मोठे यश मिळवून दिले. लाबूशेन एकदा टिकला की मोठी खेळी करण्यासाठी प्रसिद्ध असल्याने हे भारतीय संघासाठी फारच मोठे यश होते.आता ऑस्ट्रेलियन संघाची अर्धी फळी तंबूत परतली होती,अन तरीही ऑस्ट्रेलियन संघाकडे 300 धावांची आघाडी होती.यात ते किती भर घालतात यावर बरेच काही अवलंबून होते,मात्र यानंतर अलेक्स कॅरी आणि ग्रीनने जबाबदारीने खेळत पहिला एक तास तरी भारतीय गोलंदाजांना निराश करत संघाची एकूण आघाडी 329 अशी केली.जडेजा, सिराज गोलंदाजी उत्तमच करत होते ,पण दुर्दैवाने विकेट मिळवण्यात ते यशस्वी ठरले नाहीत.ग्रीन पहिल्या डावात स्वस्तात बाद झाला होता, त्यामुळे त्याला ते अपयश खूपत होते, त्याने जास्त जोखीम न उचलता आज फलंदाजी केली.

 

मात्र जडेजाने त्याला लंचच्या बरोबर अर्धा तास लागोपाठ दोन चेंडूवर बीट केल्यानंतर तिसऱ्या चेंडूवर ग्रीनने खेळायचा प्रयत्न केलेला बॉल थेट स्टंपवर जावून आदळला, आणि भारतीय संघाला मोठे यश मिळाले,ही जडेजाची तिसरी विकेट होती.यानंतर सुरू होणार होते ऑस्ट्रेलियन संघाचे शेपूट,ते वळवळणार की भारतीय गोलंदाज आपला करिष्मा दाखवणार हेच औत्सुक्याचे होते, मात्र किमान लंच पर्यंत तरी मिशेल स्टार्क आणि कॅरीने जबाबदारीने खेळून भारतीय गोलंदाजांना आणखी यश काही मिळू दिले नाही आणि आपल्या संघाची आघाडी 374ची करुन संघाला सुस्थितीत आणण्यात महत्त्वाचा वाटा उचलला.

लंचच्या वेळेस ऑस्ट्रेलियन संघांची धावसंख्या 6 बाद 201 अशी मजबूत होती. एकंदरीतच ऑस्ट्रेलियन संघाने या कसोटीवर चांगलाच वरचष्मा कायम ठेवला होता.यानंतर मिशेल स्टार्क आणि कॅरीने तब्बल 93 धावांची बहुमूल्य भागीदारी करुन आपल्या संघाला एकदम मजबूत स्थितीत आणून ठेवले. कॅरी फलंदाज म्हणून प्रसिद्ध आहेच पण स्टार्कनेही आपले महत्व अधोरेखित करताना महत्वपूर्ण  41 धावा करताना कॅरी सोबत 93 धावांची अमुल्य भागीदारी करुन संघाला एकदम मजबुत स्थितीत आणुन ठेवले.ही जोडी तुटता तुटत नव्हती, अखेर शमीने स्टार्कला 41 धावांवर बाद करून ही जोडी फोडली.त्यानंतर कर्णधार कमिन्स खेळायला आला,त्याने कॅरी सोबत डाव पुढे चालू ठेवला खरा पण शमीने त्यालाही स्वस्तात बाद करताच या ऑसी धुर्त कर्णधाराने डाव घोषित करुन भारतीय संघाला जवळपास सव्वा दिवसात जवळजवळ साडेचारशे धावा करून जिंकण्याचे मोठेच आव्हान दिले. कॅरी 66 धावा करुन नाबाद राहिला. भारतातर्फे जडेजाने सर्वाधिक 3 तर शमी ,उमेशव जडेजाने प्रत्येकी  2 गडी बाद केले.

Monsoon : 48 तासात मान्सून महाराष्ट्रात दाखल होण्याचा अंदाज

भारतासाठी हे444 धावांचे लक्ष म्हणजे शिवधनुष्य पेलण्यासारखे होते. मागील काही काळातला इतिहास बघता भारतीय संघ जरीही ऑस्ट्रेलियन संघाविरुद्ध वरचढ ठरत असला तरी कसोटी क्रिकेटमधे कधीही इतिहासासोबत जायचे नसते, प्रत्येक दिवस नवा अन आव्हान ही नवे. अर्थात भारतीय संघाने सुरुवात तरी जोरदार केली होती. गील आणि रोहितने अतिशय सकारात्मक सुरुवात करताना हे आव्हान आम्ही स्वीकारले आहे असाच जणू संदेश दिला.दोघेही आक्रमक आणि आकर्षक अंदाजात खेळत होते, पण एवढ्यात या सुंदर चित्राला जणू कोणाची नजर लागली. गील 18 धावावर असताना त्याच्या बॅटला लागलेला चेंडू स्लिप मध्ये असलेल्या ग्रीनने पकडला खरा, पण तो झेल बराचसा संशय निर्माण करणारा होता.

मात्र पंचाचा निर्णय अंतिम ठरला अन आयपीएल मधे धावांची टांकसाळ खोलणाऱ्या गीलसाठी ही कसोटी  एक दु:स्वप्न ठरली.यानंतर खेळायला आला तो भरवशाचा पुजारा ,त्याने कर्णधार रोहितला उत्तम साथ देत दुसऱ्या गड्यासाठी 51 धावांची बहुमूल्य भागीदारी करून आपल्या संघाचे आव्हान जिवंत ठेवले खरे,पण याचवेळी कर्णधार व रोहितचा मूड अचानक टेस्ट मधून 20-20 चा झाला अन तो चांगले खेळत आहे असे वाटत असतानाच वैयक्तिक 43 धावांवर असताना लायनच्या गोलंदाजीवर चुकीचा फटका मारून बाद झाला अन भारतीय संघाला फार मोठा धक्का बसला अन या धक्क्यातून सावरण्याआधीच भरवशाचा पूजाराही  अतिशय खराब फटका मारून  कमिन्सच्या गोलंदाजीवर झेलबाद झाला अन भारतीय संघ एकदम अडचणीत आला.यावेळी भारतीय संघ खूप मोठ्या संकटात सापडला होता.

यावेळी भारतीय संघाची अवस्था होती 3 बाद 93.या कठीण परिस्थितीत मैदानावर एकत्र आले ते माजी कर्णधार कोहली आणि पुनरागमन करणारा अजिंक्य रहाणे.या दोघांनाही कांगारू विरुद्ध धावा करायला आणि लढायलाही आवडते. त्याचीच प्रचिती देत या जोडीने जबरदस्त प्रतिकार करत संघाला आणखीन कुठलेही नुकसान न होवू देता 164 धावसंख्या गाठून दिली.भारतीय संघ अजूनही 280 धावांनी मागे असून उद्या दिवसभरातल्या 90 षटकात या धावा काढायचे मोठे आव्हान भारतीय संघापुढे आहे.आजच्या दिवसाचा खेळ समाप्त झाला तेंव्हा कोहली 44 धावांवर तर रहाणे 20 धावा काढून नाबाद होते.

उद्या सामन्याचा शेवटचा दिवस असून भारताला उद्या 280 धावा काढून सामना जिंकावा लागेल,अथवा (World Test World Cup ) आपल्या विकेट्स सांभाळून ठेवून सामना अनिर्णित तरी ठेवावा लागला,अन्यथा ऑस्ट्रेलियन संघांचे जेतेपद अटळ असेल.

संक्षिप्त धावफलक
ऑस्ट्रेलिया
पहिला डाव 469, आणि दुसरा डाव 8बाद 270 डाव घोषित
भारत पहिला डाव
सर्वबाद 296 आणि दुसरा डाव 3 बाद 164

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.