दि पूना प्रेस ओनर्स असोसिएशनच्या शतक महोत्सवानिमित्त 20 ते 22 सप्टेंबर दरम्यान कार्यक्रम

मुद्रणविषयक खास पोस्टल स्टॅम्प आणि पाकिटाचेही होणार अनावरण

एमपीसी न्यूज- दि पूना प्रेस ओनर्स असोसिएशन आपल्या स्थापनेची शंभरी साजरी करीत आहे. याचेच औचित्य साधत संस्थेच्या वतीने शतक महोत्सवी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष रवींद्र जोशी यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. येत्या शनिवार दि. 21 सप्टेंबर रोजी सायं. 5.30 वाजता पुणे – नगर रस्त्यावरील हयात रिजन्सी येथे सदर कार्यक्रम पार पडणार असल्याचेही त्यांनी सांगितले. यावेळी असोसिएशन उपाध्यक्ष कृष्णा उत्तेकर, सचिव अतुल वाडकर हे देखील यावेळी उपस्थित होते.

यामध्ये शनिवार दि. २१ ऑगस्ट रोजी पंजाब केसरीचे मुख्य कार्यकारी अधिकारी व मुख्य संपादक आणि पीटीआयचे अध्यक्ष विजय कुमार चोपडा यांना मुद्रण क्षेत्रात त्यांनी केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल जीवनगौरव पुरस्काराने गौरविले जाणार आहे.

याबरोबरच मुद्रण क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या 8 व्यक्तींचा देखील संस्थेच्या वतीने सन्मान करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे यामध्ये एका ज्येष्ठ महिला मुद्रकाचा देखील समावेश आहे. संस्थेच्या शंभर वर्षांच्या प्रवासाचा लेखाजोखा असलेल्या ‘शतमुद्रा’ या ग्रंथाचे प्रकाशन, गेली ८० वर्षे संस्थेच्या वतीने काढण्यात येत असलेल्या ‘मुद्रण प्रकाश’ या मासिकाच्या विशेष अंकाचे प्रकाशन आणि मुद्रणविषयक खास पोस्टल स्टॅम्प व पाकिटाचेही अनावरण या वेळी करण्यात येणार आहे. संस्थेच्या आजवरच्या वाटचालीची झलक दाखविणा-या ‘कथा शंभर पानांची’ या माहितीपटाचे प्रदर्शनही यावेळी करण्यात येईल.

सिंबायोसिसचे संस्थापक डॉ. शां. ब. मुजुमदार, टोयो इंक इंडियाचे अध्यक्ष हरुहीको अकुत्सू सान, टेकनोवा इमॅजिंग सिस्टिम्सचे अध्यक्ष प्रणव पारीख, पुणे विभागाचे पोस्ट मास्टर जनरल एस. एफ. एच. रिज्वी, हरियाणाच्या दिनबंधू छोटू राम विद्यापीठाचे उपकुलगुरु डॉ. राजेंद्रकुमार अनायथ हे देखील यावेळी उपस्थित असतील. याबरोबरच 20 व 22 सप्टेंबर रोजी अखिल भारतीय मुद्रक संघाची सर्वसाधारण सभा व नियामक मंडळाची बैठकही या ठिकाणी पार पडेल ज्यामध्ये देशभरातील तब्बल 600 ते 700 मुद्रक सहभागी होणार आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.