Pimpri : ई बसच्या तिकिटासाठी जुनेच दर; प्रवाशांनी ई बसचा वापर करण्याचे पीएमपीएमएलचे आवाहन

एमपीसी न्यूज- पीएमपीएमएलच्या ताफ्यामध्ये नवीन ई-बस दाखल झाल्या आहेत. या नवीन बसेस वातानुकूलित असल्यामुळे या बसचा तिकीट दराबाबत प्रवाशांच्या मनात संभ्रम निर्माण झाला आहे. अनेकजण या बसमधून प्रवास करण्याचे टाळत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे ई-बसचे तिकीट जुन्या बस प्रमाणेच असून प्रवाशांनी या बसचा वापर करावा, असे आवाहन पीएमपीएमएल प्रशासनाने केले आहे.

या बससाठी पास ग्राह्य आहे का ? या बसचे प्रवासाचे दर जास्त आहेत का ? असे प्रश्‍न प्रवाशांमध्ये निर्माण झाले आहेत. त्यामुळे अनेकजण या बसने प्रवास करणे टाळतात. पीएमपीएमएलने 9 फूट लांबीच्या 25 तर, 12 फूट लांबीच्या बीआरटी मार्गात धावणार्‍या 50 ई-बसेस खरेदी केल्या आहेत. 9 फुटी 10 बसेस व 12 फुटीच्या 15 बसेस पिंपरी-चिंचवड शहराच्या वाट्याला आल्या आहेत.

एका बसचे साधारण 9 ते 10 हजार रुपये उत्पन्न मिळते. ई-बसेस वातानुकूलित, आरामदायक आणि विविध सोयीसुविधांनी परिपूर्ण आहेत. यामुळे पीएमपीएमएलच्या महसूलात सुद्धा भर पडत असल्याचे चित्र आहे. मात्र, बसच्या तिकीटाबाबत प्रवाशांमध्ये संभ्रम निर्माण होत आहे. त्याचप्रमाणे या बसमध्ये प्रवास करण्यासाठी पास चालतो का, याबाबत प्रवाशांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. त्यामुळे पीएमपीएमएल प्रशासनाने ई-बसचे तिकीट जुन्या बस प्रमाणेच असून प्रवाशांनी या बसचा वापर करावा, असे आवाहन केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.