Pimpri : महापालिकेतील भ्रष्टाचाराची चौकशी करा, भापकर यांचे पालकमंत्र्यांना साकडे

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या विकासकामांच्या निविदांमध्ये मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाला आहे. भाजप पदाधिकारी आणि अधिकाऱ्यांच्या संगनमताने हा भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप करत गैरव्यवहाराची सखोल चौकशी करण्याचे साकडे सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर यांनी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांना घातले आहे. 41 प्रकरणांची कागदपत्रेच त्यांच्याकडे सुपूर्द केली आहेत.

याबाबत पालकमंत्री पाटील यांना दिलेल्या निवेदनात भापकर यांनी म्हटले आहे, भाजपाचे नेते, पदाधिकारी, नगरसेवक विकासकामे, स्वच्छता, उद्यानाचे सुरक्षा कर्मचारी यामध्ये ठेकेदार झाले आहेत. या कामात त्यांच्या पार्टनरशिप आहेत. स्थायी समितीत सत्ताधारी विरोधक संगनमत करून मोठ्या प्रमाणात टक्केवारीचे राजकारण करत आहेत. महापालिकेत करदात्या नागरिकांच्या तिजोरीवर दिवसाढवळ्या दरोडे टाकले जात आहेत.

पंतप्रधान आवास योजना, घरोघरचा कचरा गोळा करणे, ठेकेदारांची बिले अडवून 300 कोटी, भक्ती-शक्ती चौकातील उड्डाणपूल ग्रेड सेपरेटर, संतपीठ, रस्ते विकासाच्या कामातील वाढीव दराच्या नावाने भ्रष्टाचार, अनधिकृत जाहिरात फलक, होर्डिंग खर्चातील गैरव्यवहार, खासगी केबल नेटवर्कच्या रस्ते खोदकामातील गैरव्यवहार, स्मार्ट सिटी निविदा प्रक्रियेतील गैरव्यवहार अशा 41 प्रकरणांमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला आहे. त्याची सखोल चौकशी करण्याची मागणी भापकर यांनी निवेदनातून केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.