Pimpri: ‘मनुस्मृती’चे दहन केलेले म्युरल्स भीमसृष्टीत बसवा’

सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर यांची मागणी

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात उभारलेल्या भीमसृष्टीमध्ये बाबासाहेबांच्या जीवनावरील 19 प्रसंगाचे म्युरल्स बसविण्यात आले आहेत. त्यामध्ये “मनुस्मृती दहनाचे” म्युरल्स बसविण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर यांनी महापालिकेकडे केली आहे.

याबाबत महापौर राहुल जाधव, आयुक्त श्रावण हर्डीकर यांना पत्र दिले आहे. त्यात भापकर यांनी म्हटले आहे की, महापालिकेने उभारलेल्या भीमसृष्टीत बाबसाहेबांच्या जीवन प्रसंगावरील 19 प्रसंगाचे म्युरल्स बसविण्यात आले आहेत. यामध्ये मनुस्मृती दहनाचे प्रसंगाबाबतचे म्यूरल्स बसविण्याची मागणी केली होती. सातत्याने हे लक्षात आणून दिले होते. परंतु, असे असतानाही या ऐतिहासिक व क्रांतिकारी प्रसंग कसा गाळला गेला. याचे आकलन होत नाही.

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी क्रांतीस्तंभ महाड या ठिकाणी समाजात विषमतावादी व वर्णवादी व्यवस्थेला थारा देणा-या मनुस्मृतीचे जाहीर दहन केले होते. ही घटना भारताच्या व बाबासाहेबांच्या इतिहासातील क्रांतिकारी ऐतिहासिक घटना होती. बाबासाहेब प्रवाहपतित नव्हते. तर, ते प्रवाहाच्या विरुध्द लढणारे होते. हे बाबासाहेबांचे वेगळेपण होते. तोच महत्त्वाचा क्रांतिकारी प्रसंग या भिमसृष्टीच्या 19 म्युरल्समध्ये समाविष्ट केला गेला नाही. भारताच्या संसदेसमोर भारताचे संविधान जाळले जाते. तर, मनुस्मृती दहनाचा क्रांतिकारी व ऐतिहासिक कार्यक्रमाचा प्रसंग पडद्याआड करण्याचा प्रयत्न केला जातो. या मानसिकतेचा धिक्कार करत आहोत, असेही त्यांनी म्हटले आहे.

तसेच भीमसृष्टीच्या लोकार्पणाच्या दिवशीच डॉ. आंबेडकरांच्या जीवनावरील 19 प्रसंगाच्या म्युरल्स सोबत मनुस्मृती दहनाच्या प्रसंगाचे म्युरल्स लावण्याची घोषणा करण्यात यावी. 25 डिसेंबर 2019 पर्यंत मनस्मृती दहनाचे म्युरल्स या जागेत बसवण्यात आले नाही. तर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात मनुस्मृती दहनाची प्रतिकृती लावून मनुस्मृती दहनाचा जाहीर कार्यक्रम केला जाईल, असेही त्यांनी निवेदनात म्हटले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.