Lonavala : अतिक्रमणे व अनधिकृत बांधकामांकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

एमपीसी न्यूज- लोणावळा नगरपरिषदेच्या प्रशासकीय इमारतीला चायनिज खाद्यपदार्थांच्या गाड्या, पथारीवाले, हातगाडीवाले यांचा विळखा पडला असून त्यावर कोणतीही कारवाई प्रशासनाकडून होत नसल्याची खंत नगरसेवक भरत हारपुडे यांनी सभागृहात व्यक्त केली. नगरसेवक नितिन आगरवाल यांनी देखील अनधिकृत बांधकामांच्या बाबतीत प्रशासन ढिम्म असल्याची टीका केली.

नगराध्यक्ष श्रीधर पुजारी यांच्या अध्यक्षतेखाली लोणावळा नगरपरिषदेची सर्वसाधारण सभा आज पार पडली. यावेळी प्रश्नोत्तराच्या तासात नगरसेवक भरत हारपुडे यांनी मोकाट कुत्री व डुकराचा विषय गंभीर होत असल्याचे सांगितले. यावर बोलताना पुजारी म्हणाले, ” शहरात वाढलेली मोकाट कुत्री पकडण्याकरिता तीन वेळा निविदा काढण्यात आली मात्र कोणीही निविदा न भरल्याने एजन्सी नेमता आली नसल्याचे सांगितले मात्र एखाद्या भागात कुत्र्यांचा धुमाकुळ सुरु असल्यास त्यांना पकडण्याची कारवाई करण्यात येईल” असे सांगितले.

शहरात मोठ्या प्रमाणात अनाधिकृत बांधकामे वाढली आहेत, अतिक्रमणांमुळे बाजारभागातील रस्त्यांवरुन वाहने चालविणे, पायी चालणे जिकिरीचे बनले असल्याने त्यावर कारवाई व्हावी अशी मागणी हारपुडे यांनी केली. यावर मुख्याधिकारी सचिन पवार यांनी सर्व बिट अधिकार्‍यांना अनधिकृत बांधकामे तसेच अतिक्रमणे याबाबत अहवाल सादर करण्याच्या सूचना केल्या. कोणी अधिकार्‍यांनी याबाबत हलगर्जीपणा केल्यास त्यांच्यावर कारवाई करण्याचा इशारा देखील देण्यात आला आहे.

मुख्याधिकारी म्हणाले, ” शहरात जवळपास 45 जागा ओपन स्पेसच्या आहेत, यापैकी अनेक जागांवर पूर्वीपासून अतिक्रमणे झाली आहेत, अनाधिकृत बांधकामे काढण्याकरिता खाजगी एजन्सी नेमण्यात येणार आहे, याकरिता निविदा काढण्यात आली आहे लवकरच अतिक्रमणे व अनाधिकृत बांधकामांवर कारवाई केली जाईल असे सांगितले.

लोणावळा नगरपरिषदेच्या रुग्णालयासमोरील व्यापारी संकुलास कै. गोपीनाथजी मुंडे व्यापारी संकुल असे नामकरण करण्याचा ठराव मंजूर करण्यात आला. तसेच शहरातील छोटे चौक व कोपरे सुशोभित करणे, रामनगर जिल्हा परिषद शाळेसमोरील मोकळ्या जागेत वृध्द व ज्येष्ठ नागरिकांना बसण्याकरिता बाकडे बसविणे, जिम तयार करणे, सौदर्यीकरण व बगीचा तयार करणे, भारत सॉ मिल ते कैलासनगर ते हनुमान टेकडी ते कुसगाव हद्दीपर्यत अंडरग्राउंड केबल वापरुन स्ट्रिट लाईट पोल उभारणे, नगरपरिषद रुग्णालयासमोरील डाँ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याचे सुशोभिकरण करणे यासह विविध विषयांना आर्थिक व कार्योत्तर मंजुरी देणे, मंजूर ठेकेदारांना मुदतवाढ देणे, कामे झालेल्या बिलांना अंतिम मंजुरी देणे आदी विषय चर्चा करुन मंजूर करण्यात आले.

डोंगरगाव नगरपरिषदेने ग्रामपंचायत हद्दीतील रस्ते डांबरीकरणाचा तसेच आयटीआय ते डोंगरगाव हद्दीपर्यतचा रस्ता डांबरीकरण करणे हे विषय पत्रिकेतून वगळण्यात आले. खंडाळा विकास व्हॅली सोसायटी येथील गट नं. 44 व 45/2 येथिल नगरपरिषदेची खुली जागा विकसित करणे तसेच भांडवली खर्च लेखाशिर्षावर वर्गवारीचे ठराव मंजूर करण्यात आले. यावेळी सभागृहात सर्व समित्यांचे सभापती, सर्व पक्षांचे गटनेते तसेच नगरसेवक उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.