Lonavala : बेकायदेशीरपणे गौण खनिज उत्खनन केल्याप्रकरणी नामांकित कंपनीला चार कोटीचा दंड

एमपीसी न्यूज- खंडाळा शासकीय विश्रामगृहाच्या शेजारी बेकायदेशीरपणे मोठ्या प्रमाणात उत्खनन केल्याप्रकरणी एका नामांकित कंपनीला मावळच्या तहसीलदारांनी सुमारे चार कोटी रुपयांच्या दंडाची नोटीस बजावली आहे. शासनाच्या महसूल विभागाची कसलीही परवानगी न घेता सदर व्यावसायिकाने सुमारे 5804 ब्रास गौणखनिजाचे उत्खनन करत बांधकाम सुरु केले आहे. महिनाभरापूर्वी सदर उत्खननाचा पंचनामा तसेच नोटीस बजावल्यानंतरही काम निरंतर सुरु असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

खंडाळा शासकीय विश्रामगृहाला लागूनच असलेला सर्व्हे नं. 41 व 42 मधील प्लाॅट नंबर 9, 11 व 12 मधून सदरचे बेकायदेशीर उत्खनन राजरोसपणे सुरु असताना त्याच्याकडे बराच काळ महसूल विभागाचे दुलर्क्ष झाल्याने सदर व्यावसायिकाने हजारो ब्रास उत्खनन केले आहे. जमिनीत खोलवर उत्खनन करत बांधकाम वेगात सुरु आहे. खंडाळा गावकामगार तलाठी यांनी 21 डिसेंबर 2019 रोजी सदर जागेचा पंचनामा करत त्याठिकाणी सुमारे 5804 ब्रास माती, मुरुम व दगड या गौण खनिजाचे उत्खनन झाले असल्याचा अहवाल मावळचे तहसीलदार मधुसूदन बर्गे यांना सादर केला होता.

सदरच्या अहवालानुसार महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 चे कलम 48 (7) नुसार सदरची दंड आकारणी करण्यात आली आहे. 28 जानेवारी 2020 रोजी दंडाची नोटीस तहसीलदार मावळ यांनी बजावली असून सदर नोटीसीचा सात दिवसात खुलासा न केल्यास पुढील कायदेशीर प्रक्रिया करणार असल्याचे तहसीलदारांनी नोटीसीत म्हंटले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.