पिंपरी महापालिकेत स्वच्छ आणि चांगला कारभार करणार – लक्ष्मण जगताप

एमपीसी न्यूज – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली पिंपरी-चिंचवड महापालिकेवर भाजपची एकहाती सत्ता  आली आहे. पक्षाचे जुने कार्यकर्ते, संघाचे ज्येष्ठ नेते यांचे मार्गदर्शन घेऊन पिंपरी महापालिकेत स्वच्छ आणि चांगला कारभार करणार आहे, असे भाजपचे शहराध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप यांनी सांगितले. तसेच अपक्ष नगरसेवक देखील आपल्याबरोबरच असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

पिंपरी-चिंचवड महापालिकेवर एकहाती सत्ता आल्यानंतर सायंकाळी भाजपच्या कार्यकर्त्यांनी पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौकात ढोल – ताशाच्या गजरात आनंदोत्सव साजरा केला. त्यावेळी आमदार जगताप बोलत होते. यावेळी खासदार अमर साबळे, लेखा समितीचे अध्यक्ष सचिन पटवर्धन, प्रदेश सदस्या उमा खापरे, माजी शहराध्यक्ष सदाशिव खाडे, सरचिटणीस महेश कुलकर्णी, बाबू नायर, प्रमोद निसळ उपस्थित होते.

पिंपरी महापालिकेवर भाजपची एकहाती सत्ता येणार असल्याचे आपण यापूर्वीच सांगितले होते. राष्ट्रवादीचे जेवढे नगरसेवक आहेत, तेवढे भाजपचे येणार असल्याचे मी म्हटले होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली पिंपरी-चिंचवड महापालिकेवर भाजपचे कमळ फुलले आहे, असे आमदार जगताप म्हणाले.

शिवसेनेच्या भल्यासाठी त्यांच्यासोबत युती करण्यासाठी आम्ही प्रयत्न केला होता. मात्र, त्यांनी युती तोडली. युती तुटल्याचा भाजपला फायदा झाला आहे. भाजपचे 77 नगरसेवक निवडून आले आहेत. तसेच पाच अपक्ष नगरसेवकही आपल्यासोबतच असल्याचे जगताप यांनी सांगितले.

खासदार श्रीरंग बारणे उरले ‘जॅकेट’ पुरते!

शिवसेनेचे खासदार श्रीरंग बारणे थेरगावातील शिवसेनेचे चार उमेदवारही निवडून आणू शकले नाहीत. थेरगावातून भाजपचे दोन उमेदवार निवडून आले आहेत. बारणे मोठा कांगावा करत होते. त्यांना जनतेने त्यांची जागा दाखवून दिली आहे. बारणे थेरगावापुरतेही राहिले नसून फक्त ‘जॅकेट’ पुरते उरले असल्याची खोचक टीका, आमदार जगताप यांनी खासदार बारणे यांच्यावर केली.

पिंपरी-चिंचवड महापालिकेतील राष्ट्रवादीची पाशवी सत्ता उलथवून लावण्याचे काम भाजपने केले आहे. राष्ट्रवादीने महापालिकेत केलेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करणार असून शहरातील शास्तिकर, रेडझोन सर्व प्रलंबित प्रश्न सोडविणार असल्याचे, खासदार अमर साबळे यांनी सांगितले.  युतीत आमची 25 वर्ष सडली अशी शिवसेना म्हणते. त्यामुळे सडलेल्यांबरोबर आमची युती झाली नाही, हे चांगलेच झाले असेही, साबळे म्हणाले.

"jagtap
"jagtap
"jagtap
"jagtap
"jagtap

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.