पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपला अपेक्षेपेक्षा मोठा विजय मिळाला – गिरीश बापट

एमपीसी न्यूज – राष्ट्रवादीच्या काळात पिंपरी-चिंचवड शहराचा विकास झाला आहे. मात्र, भ्रष्टाचारही मोठ्या प्रमाणात झाला आहे. भ्रष्टाचार केल्यामुळे जनतेने राष्ट्रवादीला नाकारले आहे. राज्य सरकाची दोन वर्षाची कामगिरी पाहून शहरातील जनतेने भाजपला अपेक्षेपेक्षा मोठे यश दिले आहे, असे पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट म्हणाले. तसेच पिंपरी महापालिकेत झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशीही करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

पिंपरी-चिंचवड महापालिकेत भाजपची एकहाती सत्ता आली आहे. त्यानंतर आज (शुक्रवारी) पिंपरीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी भाजपचे शहराध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप, खासदार अमर साबळे, आमदार महेश लांडगे, आझम पानसरे, लेखा समितीचे अध्यक्ष अॅड. सचिन पटवर्धन, प्रदेश सदस्या उमा खापरे, एकनाथ पवार यांच्यासह भाजपचे नवनिर्वाचित नगरसेवक उपस्थित होते.  

पालकमंत्री गिरीश बापट म्हणाले, भाजपचे संघटनमंत्री रवी अनासपुरे यांनी ‘एक हजारी भाग’ ही पद्धत राबविली. त्यामुळे संघटना चांगली बांधली गेली. संघटनेच्या जोरावर पिंपरी-चिंचवड महापालिकेवर भाजपचे कमळ फुलले आहे. भाजपला बहुमत मिळेल अशी अपेक्षा होती. मात्र अपेक्षेपेक्षा जास्त यश मिळाले आहे.

राज्य सरकारची दोन वर्षाची कामगिरी पाहून शहरातील जनतेने भाजपाला कौल दिला आहे. भाजपाला विकासाठी जनतेने निवडून दिले आहे. त्यामुळे एकही दिवस वाया न घालवता विकास कामे करण्यास सुरवात करणार आहोत. विमानतळ, मेट्रो, रेडझोन, औद्योगिक प्रदर्शन, पीएमपीएमएल बस खरेदी करणे, लोणावळा-दौंड तिसरा रेल्वे मार्ग, रस्ते रुंद करणे, विकास आराखाड्याची 100 टक्के अमंलबजावणी करणे अशी विविध कामे नियोजन करुन आम्ही करणार आहोत. जाहीरनाम्यात दिलेली सर्व आश्वासने पुर्ण करणार असल्याचे, बापट यांनी सांगितले.

पिंपरी-चिंचवडमध्ये 15 वर्ष अजित पवारांची सत्ता होती. त्यांनी नागरिकांना अपेक्षित असे कामे केली नाहीत. त्यामुळे जनतेने त्यांना नाकाराले आहे, असे सांगत बापट म्हणाले, तीन महिन्यातून एकदा जाहीरनाम्यातील किती कामे झाले आहेत, याचा आढावा घेणार आहे. सर्वांना बरोबर घेऊन शहराचा विकास करणार आहे, असे बापट यांनी सांगितले.

शहरातील निर्णय शहरात होणार की मुंबईत असे पत्रकारांनी विचारले असता बापट म्हणाले, स्थानिक प्रश्न शहर पातळीवर सोडविले जातील आणि राज्य पातळीवरील प्रश्न राज्य स्तरावर सोडविणार असल्याचे, बापट यांनी सांगितले. शहराला लाल दिवा मिळणार का असे विचारले असता ते म्हणाले, लाल दिवा देण्याचा अधिकार मुख्यमंत्र्यांचा आहे. त्याबाबत मुख्यमंत्रीच योग्य तो निर्णय घेतील.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.