एल अॅण्ड टी इन्फोटेक, एचएसबीसी संघांची विजयी सलामी

तिसरी विंटेज्‌ करंडक 2017 ट्‌वेंटी-20 क्रिकेट स्पर्धा

एमपीसी न्यूज – प्रथम स्पोर्टस्‌ मॅनेजमेंट आयोजित तिसर्‍या विंटेज्‌ करंडक 2017 ट्‌वेंटी-20 क्रिकेट स्पर्धेत एचएसबीसी, एल अॅण्ड टी इन्फोटेक या संघांनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करून विजयी सलामी दिली.

पीसीएमसी व्हेरॉक वेंगसरकर क्रिकेट अकादमी येथील मैदानावर सुरू असलेल्या या स्पर्धेत पहिल्या साखळी फेरीच्या सामन्यात विनय गुरव (56 धावा व 2-35) याने केलेल्या अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर एचएसबीसी संघाने अंश सिस्टिमचा 57 धावांनी पराभव करून शानदार सुरुवात केली. प्रथम फलंदाजी करताना एचएसबीसीने 20 षटकात 5 बाद 209 धावांचे आव्हान उभे केले.

यात रघुनाथन 58, विनय गुरव 56 यांनी अर्धशतकी खेळी करून संघाला 209 धावांचे आव्हान उभे करून दिले. या आव्हानाचा पाठलाग करताना अंश सिस्टिम संघाला निर्धारित षटकात 156 धावांपर्यंतच मजल मारता आली. यामध्ये निखिल जोशी 47, सोहम केळकर 42 यांनी दिलेली लढत अपुरी ठरली. एचएसबीसीकडून विनय गुरवने 35 धावात 2 गडी बाद करून संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. सामनावीर विनय गुरव ठरला.

दुसऱ्या सामन्यात सचिन सोनावणे(4-19) याच्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर  एल अॅण्ड टी इन्फोटेक संघाने सिनर्जीप संघाचा 7 गडी करून पराभव केला. एल अॅण्ड टी इन्फोटेकच्या सचिन सोनावणेने 19 धावात 4 गडी, तर स्नेहल खामणकरने 12 धावात 1 गडी बाद करून सिनर्जीप संघाचा डाव 98 धावात गुंडाळला. यात अमेय काळे 25, जगदीप पठारे 23 यांनी थोडासा प्रतिकार केला. एल अॅण्ड टी इन्फोटेक संघाने हे आव्हान 14.3 षटकात 3 बाद 102 धावा काढून पूर्ण केले. यामध्ये पारितोश मैथिल नाबाद 46, अभिलाष होटा 21, यांनी धावा काढून संघाचा विजय सुकर केला. सामनावीर सचिन सोनावणे ठरला.

स्पर्धेचे उद्घाटन विंटेज्‌ करंडक स्पर्धेच्या रितीरिवाजाप्रमाणे दोन्ही संघाच्या कर्णधारांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रथम स्पोर्टस्‌ मॅनेजमेंटचे चेअरमन अमित जगताप, संचालक सुजय निकम, संचालक भाऊसाहेब डांगे, मंगेश मते आणि हेमंत पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.

स्पर्धेचा सविस्तर निकाल: साखळी फेरी:

एचएसबीसी: 20 षटकात 5 बाद 209 धावा (रघुनाथन 58 (34), विनय गुरव 56 (45), निखिल जोशी 1-26, निनाद पत्की 1-36)वि.वि.अंश सिस्टिम: 20 षटकात 5 बाद 156 धावा (निखिल जोशी 47 (41), सोहम केळकर 42 (28), विनय गुरव 2 -35);सामनावीर-विनय गुरव; एचएसबीसी 57 धावांनी विजयी;

सिनर्जीप: 20 षटकात सर्वबाद 98 धावा (अमेय काळे 25 (26), जगदीप पठारे 23 (29), सचिन सोनावणे 4-19, स्नेहल खामणकर 1-12) पराभूत वि. एल अॅण्ड टी इन्फोटेक: 14.3 षटकात 3 बाद 102 धावा (पारितोश मैथिल नाबाद 46 (37), अभिलाष होटा 21 (27), विग्नेश अल्पे 2-24, संतोष 1-13); सामनावीर-सचिन सोनावणे; एल अॅण्ड टी इन्फोटेक 7 गडी राखून विजयी.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.