‘राजाभाऊ शहाडे करंडक’ पीवायसी-ग्रीन बेझ खुल्या स्नुकर अजिंक्यपद स्पर्धेत केतन चावला विजेता


एमपीसी न्यूज – पीवायसी हिंदू जिमखाना आयोजित दुसर्‍या ‘राजाभाऊ शहाडे करंडक’ पीवायसी-ग्रीन बेझ खुल्या स्नुकर अजिंक्यपद स्पर्धेत मुंबईच्या केतन चावला याने राहूल सचदेव याचा 4-1 असा पराभव करून विजेतेपदाला गवसणी घातली.

पीवायसी हिंदू जिमखाना येथे झालेल्या स्पर्धेच्या अंतिम फेरीत केतनने राहुलचा 4-1 असा सहज पराभव केला. अडीच तास चाललेल्या या सामन्यात केतनने आश्‍वासक सुरुवात करत पहिल्या तीन फ्रेम्स् 66-18, 63-29, 79-24 अशा जिंकून 3-0 आघाडी घेतली. राहुलने 0-3 अशा पिछाडीवरून चिवट खेळ केला. चौथी आणि पाचवी फ्रेम्स् 74-32, 61-09 अशी जिंकून 2-3 अशी आघाडी कमी केली. सहाव्या फ्रेममध्ये केतनने अचूक लक्ष्य साधत ही फ्रेम 63-13 अशी जिंकून विजेतेपद संपादन केले. 

स्पर्धेचे पारितोषिक वितरण पीवायसी हिंदू जिमखाना क्लबचे अध्यक्ष विजय भावे, बिलियर्डस् आणि स्नुकर विभागाचे सचिव शशांक हळबे, राजाभाऊ शहाडे यांची कन्या प्राजक्ता शहा आणि राजाभाऊ शहाडे यांची नात सनाया शहा यांच्या हस्ते करण्यात आले. 

विजेत्या केतन चावला याला करंडक आणि 30 हजार रुपये तर, उपविजेत्या राहुल सचदेव याला करंडक आणि 10 हजार रुपयांचे पारितोषिक देण्यात आले. उपांत्य फेरीतील निमिश कुलकर्णी आणि हिमांशू जैन यांना साडेसात हजार रुपये आणि करंडक देण्यात आले. स्पर्धेत सर्वाधिक गुणांचा ब्रेक नोंदविणार्‍या अभिमन्यू गांधी याला 5 हजार रुपये आणि करंडक देण्यात आला. अभिमन्यूने पहिल्या फेरीत 89 गुणांचा ब्रेक नोंदविला होता. 

मुख्य ड्रॉः अंतिम फेरीः केतन चावला (मुंबई) वि.वि. राहूल सचदेव (मुंबई) 66-18, 63-29, 79-24, 32-74, 09-61, 63-13.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.