साधू वासवानी मिशन करणार 99 तासांचा महामृत्युंजय यज्ञ महोत्सव


एमपीसी न्यूज – साधू वासवानी मिशनचे गुरू दादा जे पी वासवानी यांच्या 99 व्या वाढदिवसानिमित्त पुणे येथील साधू वासवानी मिशन भवन येथे 99 तासांचा महामृत्युंजय यज्ञ महोत्सव करण्यात येणार आहे. या यज्ञ महोत्सवासाठी भारताच्या विविध भागातून लोक येणार आहेत.

जे पी वासवानी (दादा) यांचा वाढदिवस 2 ऑगस्ट रोजी आहे. त्यानिमित्त शनिवार (दि. 29 जुलै) ते बुधवार (दि. 2 ऑगस्ट) दरम्यान विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. पाचदिवसीय कार्यक्रमाची थीम ‘प्रेमाशिवाय काहीही नाही’ ही असणार आहे. कोणत्याही परताव्याची अपेक्षा न बाळगता प्रेम देत रहा, अशी शिकवण वासवानी मिशनद्वारे देण्यात येत आहे.

पहिल्या दिवशी (शनिवार) सकाळी सहा वाजल्यापासून 99 तासांच्या महामृत्युंजय यज्ञास सुरुवात होणार आहे. सायंकाळी सहा वाजता कीर्तन रास कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमासाठी देशाच्या विविध भागातून गायक येणार आहेत. रविवारी सकाळी सहा वाजता दादा जे पी वासवानी यांच्या सोबत ‘योग्य पर्याय निवडा’ या विषयावर प्रेरणात्मक चर्चासत्र होणार असून या चर्चासत्राचे निवेदन अभिनेता कबीर बेदी करणार आहे. सोमवारी सकाळी साडेसहा वाजता ‘द क्विस्ट’ नावाचा रंगमंचीय कार्यक्रम होणार आहे.

मंगळवारी ‘माय आयडॉल’ हा दादांवर आधारित सांगितिक चित्रपट दाखविण्यात येणार आहे. बुधवार (दि. 2) रोजी दुपारी दोन वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे दादांना वाढदिवसाच्या शुभेच्छा संदेश देणार आहेत. हा कार्यक्रम सर्वांसाठी खुला आहे. या पाचदिवसीय कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण साधू वासवानी मिशनच्या http://www.sadhuvaswani.org या संकेतस्थळावर करण्यात येणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.