हृदयविकाराच्या झटक्‍याने सागर चौगुले याचा प्रयोगावेळी रंगमंचावरच मृत्यू

 

एमपीसी न्यूज –  पुण्यात प्रयोग सादर करत असताना रंगमंचावरच हृदयविकाराचा झटका येवून कोल्हापूरचा अभिनेता सागर चौगुले याचा काल (शुक्रवारी) मृत्यू झाला. पुण्यातील टिळक स्मारक मंदिरात प्रयोग सुरू असतानाच हा प्रकार घडला.

 

तत्काळ सागरला रूग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारांपूर्वीच त्याचे निधन झाल्याचे डॉक्टरांनी जाहीर केले . या साऱ्या धक्कादायक प्रकाराने कला क्षेत्रावर शोककळा पसरली आहे.

 

राज्य सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे 56 व्या हौशी राज्य नाट्य स्पर्धेच्या कोल्हापूर केंद्रातून हृदयस्पर्श हौशी नाट्य संस्थेच्या "अग्निदिव्य’ या नाटकाची अंतिम फेरीसाठी निवड झाली होती. काळम्मावाडीच्या हनुमान नाट्य संस्थेच्या सहकार्याने हे नाटक सादर झाले. प्राथमिक फेरीत राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या भूमिकेसाठी सागर याला अभिनयाचे रौप्यपदकही मिळाले. अंतिम फेरीत बाजी मारायचीच, या निर्धाराने हे कलाकार गेली महिनाभर कसून सराव करीत होते.

 

पुण्याला जाण्यापूर्वी गेल्याच आठवड्यात या नाटकाचा सदिच्छा प्रयोगही केशवराव भोसले नाट्यगृहात झाला होता. कोल्हापुरातील बहुतांशी सर्वच कला संस्था आणि सेवाभावी व्यक्तींनी या नाटकाला शुभेच्छा दिल्या. शुक्रवारी सकाळी पन्नासहून अधिक कलाकार-तंत्रज्ञांचा संघ पुण्याला रवाना झाला. रात्री आठ वाजता प्रयोग सुरू झाला. नाटकातील दोन प्रवेश झाले आणि चौगुले याला रंगमंचावरच चक्कर आल्याचे सहकलाकाराच्या लक्षात आले.  प्रयोगाला उपस्थित असणाऱ्या काही डॉक्‍टरांनी चौगुले याच्यावर प्राथमिक उपचार केले आणि त्यांना तत्काळ रुग्णालयात हलवले.

 

सागर हा नामवंत गायक सुरेश वाडकर यांचा भाचा होता. सागरचे वडील मराठी चित्रपट दिग्दर्शक होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.