बुधवार, ऑक्टोबर 5, 2022

माजी आमदार दीपक पायगुडे यांच्यावर बँकेची फसवणूक केल्या प्रकरणी गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – लोकसेवा सहकारी बँकेचे अध्यक्ष तसेच माजी आमदार दीपक पायगुडे व बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सी.ई.ओ.) विनायक पिटके यांच्यावर बँकेची फसवणूक केल्या प्रकरणी समर्थ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अनियमित कर्जप्रकरणे तसेच त्यातील रक्कम स्वतः स्थापन केलेल्या खात्यात वर्गकरून बँकेची फसवणूक केल्याप्रकरणी समर्थ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बँकेच्या लेखापरीक्षणात ही बाब उघडकीस आल्यानंतर लेखा परीक्षक कांताराम खंडुजी खिरड (वय 54, रा. शिवाजीनगर) यांनी याप्रकरणी फिर्याद दिली. 

याप्रकरणी पोलिसांनी दिलेली सविस्तर माहिती अशी की,  फिर्यादी खिरड यांना पुणे शहर जिल्हा उपनिबंधक व सहकारी संस्थेचे जिल्हा उपनिबंधक किरण सोनवणे यांनी महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियमानुसार 2014 मध्ये बँकेचे लेखापरीक्षण करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार, त्यांनी सन 2013 – 2014 चे लेखापरीक्षण केले. दरम्यान, कोणत्याही सहकारी बँकेला सहकार आयुक्त तसेच रिझर्व्ह बँकेने दिलेल्या नियमाप्रमाणे काम करणे बंधनकारक असते. तसेच, नियमावलीप्रमाणे बँकेचे कामकाज सुरू आहे का, याबाबत रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया यांच्याकडून दरवर्षी बँकांचे लेखापरीक्षण होते.

त्यामध्ये लोकसेवा बँकेच्या व्यवहारात आखून देण्यात आलेल्या कोणत्याच नियमांचे पालन न केल्याचे आढळून आले आहे. तसेच, बँकेचे संचालक मंडळातील सभासादांना बैठक किंवा सभा घेऊन विश्वासात न घेता बँक खातेदारांचे व इतरांचे नावे मोठ्या प्रमाणात अनियमीत कर्ज प्रकरणे केली. तसेच, त्यातील रक्कम बँकेचे अध्यक्ष दिपक पायगुडे यांनी स्थापन केलेल्या लोकसेवा प्रतिष्ठान या संस्थेच्या खात्यावर वर्गकरून अपहार करण्यात आल्याचे लेखापरीक्षणामध्ये उघडकीस आले आहे. त्यानंतर याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, या घटनेमुळे बँकेच्या खातेदारांसह राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे.

spot_img
Latest news
Related news