कुदळवाडीतील आगीच्या घटनांमुळे लोकवस्तीला धोका!

तब्बल 1500 विनापरवाना भंगार दुकाने; महापालिकेचे दुर्लक्ष  

एमपीसी न्यूज – कुदळवाडी परिसरात पुन्हा एकदा अग्नीतांडव झाले आहे. कुदळवाडी, चिखली परिसरात हजारो भंगार दुकाने बेकायदा, विनापरवाना उभारण्यात आली आहेत. या दुकानांमध्ये आगीच्या घटना वारंवार घडत असल्यामुळे लोकवस्तीला मोठा धोका निर्माण झाला आहे. या विनापरवाना भंगाराच्या दुकानांवर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे. रविवारी लागलेल्या आगीत मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. 

पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीमध्ये कुदळवाडी, चिखली हा परिसर येत असून, या ठिकाणी भंगार मालासह अन्य दुकानेही आहेत. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आर्थिक उलाढाल होत असते. मात्र, महापालिका प्रशासन, पोलिसांकडून जितके लक्ष द्यायला हवे, तितके दिले जात नाही. त्यामुळे अनेकदा दुर्घटना घडूनही त्याकडे गांभीर्याने पाहिले जात नाही.  या भागात असणारी भंगार मालाची बरीच दुकाने रहिवासी क्षेत्रात आहेत. त्यापैकी अनेक दुकानांना पिंपरी महापालिकेचा उद्योग व्यवसाय परवानाही मिळालेला नसल्यामुळे ही दुकाने बेकायदेशीर ठरतात.

कुदळवाडी, विसावा चौकातील एका भंगारच्या दुकानाला रविवारी रात्री साडेअकराच्या सुमारास अचानक आग लागली. प्लास्टिक व अन्य ज्वलनशील वस्तू असल्याने आग भडकली आणि आजूबाजूच्या दुकानांनीही पेट घेतला. पुणे शहरातील 15 ते 20 बंबाच्या सहाय्याने अग्निशामक दलाचे जवान आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न करत होते. सहा तासाच्या अथक प्रयत्नानंतर आग आटोक्यात आली असून अजुनही धूर धुमसत आहे.

दाटीवाटीने वसलेल्या या परिसरात आगीची घटना घडल्यास अग्निशामक दलाचे जवान, वाहनांना तिथपर्यंत पोहोचण्यासाठी रस्तेही अपुरे आहेत. या परिसरात लोकवस्ती वाढतच असून, जागा अपुरी पडत आहे. यापूर्वीही सात ते आठवेळा अनेकदा आग लागल्याच्या घटना घडल्या आहेत. वेळोवेळी लागलेल्या आगीत मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

फेब्रुवारी 2016 मध्ये कुदळवाडीतील, विसावा चौकातीलच लाकडाच्या वखारीला भीषण आग लागली होती. यामध्ये वखारीसह 70 ते 80 दुकाने जळून खाक झाली होती. या आगीत मोठ्या प्रमाणात वित्तहानी झाली होती. या अग्नितांडावानंतर महापालिका प्रशासन खडबडून जागे झाले. त्यानंतर तत्कालीन आयुक्त राजीव जाधव यांनी भंगार दुकानांचे सर्व्हेक्षण करण्याचे प्रशासनाला आदेश दिले होते. सर्व्हेक्षणात 1500 जणांकडे परवानगी नसल्याचे उघड झाले होते.

”कुदळवाडीत 1500 गोडाऊन अनधिकृत आहेत. दोन महिन्यापूर्वीच त्यांना नोटीस देण्यात आली होती. प्रदूषण मंडळाचे ना हरकत प्रमाणापत्र, दुकानाचे बांधकाम अधिकृत असल्याचे प्रमाणपत्र असल्यावर महापालिका उद्योग व्यवसायासाठी परवानगी देते, असे सहाय्यक आयुक्त योगेश कडूसकर यांनी सांगितले. तसेच अनधिकृत गोडाऊनवर कारवाई करण्याचा अधिकार बांधकाम विभागाचा आहे. त्यांच्यावर ते पुढील कारवाई करतील”, असेही त्यांनी स्षट केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.