रसिक प्रेक्षकांकडून भरभरून मिळालेली दाद हाच खरा पुरस्कार – भालचंद्र कुलकर्णी

निगडीत रंगला महिला दिनाचा सुपरहिट जल्लोष

एमपीसी न्यूज – आमची कलावंतांची जात आणि प्रेक्षकांचे मनोरंजन करणे हा आमचा धर्म. तसेच होत असलेले सत्कार हा कलाकारांसाठी टॉनिक असून रसिक प्रेक्षकांकडून भरभरून मिळालेली दाद हाच खरा पुरस्कार असल्याच्या भावना सुप्रसिद्ध ज्येष्ठ अभिनेते भालचंद्र कुलकर्णी यांनी निगडीमध्ये व्यक्त केल्या.

जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने दुर्गेश्वर मित्र मंडळ आणि अनुष्का स्त्री कला मंच यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवारी (दि. 8) ‘सुपरहिट जल्लोष महिला दिनाचा’ कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी भालचंद्र कुलकर्णी यांना मिळालेल्या जीवनगौरव पुरस्काराप्रित्यर्थ त्यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. यावेळी दुर्गेश्वर मित्र मंडळाचे अध्यक्ष आणि प्रभाग क्रमांक 15 चे नवनिर्वाचित नगरसेवक अमित गावडे आणि अनुष्का स्त्री कला मंचच्या अध्यक्षा शर्मिला महाजन आणि त्यांच्या सहकारी आदी उपस्थित होते.

भालचंद्र कुलकर्णी यांनी ‘अस्सल मराठमोळा कार्यक्रम’ अशा शब्दांत सादर झालेल्या गीतांच्या कार्यक्रमाचे कौतुक केले.  तसेच हल्लीच्या कार्यक्रमांमधून मराठीपण हरवत चालले आहे, अशी खंत व्यक्त केली. ते पुढे म्हणाले की, आपल्यालाच मराठी असल्याचा विसर पडत चालला आहे. मराठी माणसानेच मराठीकडे पाठ फिरवली आहे आणि ही अतिशय गंभीर बाब आहे. तमाशाला चित्ररूप देणारे व्हि. शांताराम तसेच ग. दी. माडगूळकर हे आमचे गुरु आहेत. आमची तमासगीर, कलावंतांची जात असून प्रेक्षकांचे मनोरंजन हाच आमचा धर्म असतो. आम्ही भूमिका जगत असतो, असे मनोगत व्यक्त करत कलावंत कसा असतो यावरीलही त्यांचे अनुभव त्यांनी कथन केले. तसेच जगातील अत्यंत प्रमाणिक जात म्हणजे मास्तर असे सांगत शिक्षकांची तळमळ आणि व्यथा मांडणारी ”मन आमचं मरतं आहे आणि आम्ही जगतो आहोत” ही कविताही सादर केली.

यावेळी निगडी प्राधिकरणातील सहा महिला साहित्यिकांचा सत्कार भालचंद्र कुलकर्णी यांच्या हस्ते करण्यात आला. यामध्ये रजनी सेठ, प्रा. समिता टिल्लू, अर्चना वर्टीकर, माधवी महाजन, डॉ. प्रज्ञा कुलकर्णी आणि छाया पाखरे या महिला साहित्यिकांना सन्मानित करण्यात आले. तसेच पुढील वर्षी प्राधिकरणातील सर्व महिला लेखिकांच्या कथा आणि कवितांच्या पुस्तकाचे प्रकाशन करण्याचा मानसही अनुष्का स्त्री कला मंचच्या अध्यक्षा शर्मिला महाजन यांनी व्यक्त केला.

यावेळी महाराष्ट्राची संस्कृती जपणारा आणि सुशील गणपत आंबेकर यांची प्रस्तूती असलेल्या ‘सुपरहिट जल्लोष महिला दिनाचा’ हा मराठी-हिंदी गीतांच्या कार्यक्रमाचा महिलांनी मनसोक्त आस्वाद घेतला. मराठीतील ‘नटरंग उभा…’, ‘मन उधाण वा-याचे’ या गीतांबरोबरच गवळण आणि गझल यांच्या सादरीकरणाने हा कार्यक्रम चांगलाच रंगला.

कार्यक्रमा दरम्यान अनुष्का स्त्री कला मंचच्या वतीने व्यवसायात उतरू पाहणा-या महिलांना मार्गदर्शनासाठी एक व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने ‘घे भरारी… एक पाऊल स्वयंम् सिद्धतेकडे’ या प्रशिक्षण व व्यवसाय मंचची स्थापना करण्यात आली. यामध्ये व्यवसायासाठी लागणारे मार्गदर्शन, नियोजन आणि मार्केटिंग याबद्दलची संपूर्ण माहिती देण्यात येणार आहे.

या कार्यक्रमापूर्वी महिलांसाठी मोफत तपासणी शिबिरही घेण्यात आले तसेच बचतगटांच्या उत्पादनांसाठीही स्टॉल्स ठेवण्यात आले होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्योती कानिटकर यांनी केले तर वृंदा गोसावी यांनी आभार मानले.

"bhalchandra

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.