सोमवार, ऑक्टोबर 3, 2022

…अखेर समाविष्ठ गावांना न्याय; च-होलीतील नितीन काळजे यांचा महापौरपदासाठी अर्ज

आमदार महेश लांडगे यांनी मारली बाजी

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेत समाविष्ठ झालेल्या गावांना न्याय मिळवून देण्यासाठी सत्ताधारी भाजपने महापौरपदाचा मान नगरसेवक नितीन काळजे यांना दिला आहे.

मुंबई येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे स्थानिक नेते यांच्यात गुरुवारी पिंपरी-चिंचवडच्या महापौरपदाबाबत चर्चा झाली. भाजपचे शहराध्यक्ष आणि आमदार लक्ष्मण जगताप यांनी नगरसेवक शत्रुघ्न काटे, नामदेव ढाके, संतोष लोंढे यांच्यासह शितल शिंदे, संदीप वाघेरे, राहुल जाधव आणि नितीन काळजे हे महापौरपदासाठी इच्छुक असल्याचे सांगितले होते. 

महापौरपद आमदार लक्ष्मण जगताप गटाला मिळणार की आमदार महेश लांडगे गटाला याबाबत गेल्या दोन-तीन दिवसांपासून राजकीय वर्तुळात चर्चा सुरू होती. विधानसभा निवडणुकीच्या वेळी भोसरी विधानसभा मतदार संघातील समाविष्ठ गावांना न्याय मिळवून देण्याचे आमदार महेश लांडगे यांनी आश्वासन दिले होते. आमदार झाल्यानंतर लांडगे यांनी च-होली, मोशी, दिघी आदी परिसरात मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिला. त्यांच्या माध्यमातून च-होली परिसरातील मोठ्या प्रमाणात विकास कामे झाली आहेत.

नगरसेवक नितीन काळजे हे आमदार लांडगे यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जातात. महापालिका निवडणुकीतही समाविष्ठ गावांबाबत राष्ट्रवादीने केलेला दुजाभाव आमदार लांडगे यांनी नागरिकांसमोर मांडला. परिणामी, समाविष्ठ गावांतील नागरिकांनी भाजपच्या उमेदवारांना भरभरून मते दिली आहेत. त्यामुळे आता महापौरपद समाविष्ठ गावातील नगरसेवकाला मिळणार का? याबाबत नागरिकांची उत्सुकता शिगेला पोहोचली होती. आमदार लांडगे यांनी नितीन काळजे यांना महापौरपद देऊन महापालिकेत समाविष्ठ झालेल्या गांवाना न्याय दिला आहे.

आमदार लांडगे यांनी शब्द पाळला!

विधानसभा निवडणुकीत अपक्ष असतानाही आमदार महेश लांडगे यांना सर्वपक्षीय नगरसेवकांनी मदत केली होती. त्यामध्ये समाविष्ठ गावांतील नगरसेवकांची संख्या जास्त होती. महापालिका निवडणुकीला सामोरे जाताना आमदार लांडगे यांनी ‘भाजपच्या माध्यमातून मी समाविष्ठ गावांना न्याय मिळवून देणार आहे. येथील पायाभूत सोयी-सुविधा सक्षम करण्यासाठी प्रयत्न करणार आहे’, अशी ग्वाही स्थानिक नागरिकांना दिली होती. सत्ताधारी भाजपकडून पहिल्यांदाच समाविष्ठ गावातील आणि आमदार लांडगे समर्थक नगरसेवक नितीन काळजे यांना महापौरपद दिले आहे. त्यामुळे आमदार लांडगे यांनी स्थानिक नागरिकांना दिलेला ‘शब्द’ पाळला आहे, अशी चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे.

spot_img
Latest news
Related news