पुणे भारत स्काउट गाईड जिल्हा मेळाव्यात पर्यावरण संवर्धनाचा जागर

एमपीसी न्यूज – मारुंजी येथे पुणे भारत स्काउट गाईड तर्फे नुकत्याच पार पडलेल्या जिल्हा मेळाव्यामध्ये विद्यार्थी व शिक्षकांमध्ये पर्यावरण जनजागृती व्हावी, यासाठी पिंपरी-चिंचवडमधील पर्यावरण संवर्धन समिती अध्यक्ष विकास पाटील यांनी मार्गदर्शन केले.


यावेळी जिल्ह्यातील 1 हजार विद्यार्थी व 50 शिक्षक उपस्थित होते. ओला व सुका कचरा, दैनंदिन जीवनातील उदाहरणे, पाण्याची बचत, स्वच्छता महत्व प्रदूषण, वृक्षसंवर्धन, प्लास्टिकमुक्त परिसर या विषयांवर विकास पाटील यांनी मनोरंजनात्मक मार्गदर्शन केले.

प्रत्येक विद्यार्थ्याने जर स्वतःच्या घरी 10 रोपे पिशवीत तयार केली व ती एक वर्ष जोपासली तर आपण दरवर्षी लाखो रोपे निर्माण करून त्यांचे वृक्षारोपण करू शकतो, असे पटवून देऊन मुलांची यासाठी मानसिकता तयार केली. तसेच ज्यांनी मेळाव्यात परिसर स्वच्छता, शिस्त राखली व उत्कृष्ठ कार्य करून मेळावा यशस्वी करण्याचा प्रयत्न केला त्या 10 उत्कृष्ट शिक्षकांना व कर्मचारी, विद्यार्थीसहित प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला.

मेळाव्यातील शोभायात्रेत मारुंजी ग्रामस्थांनी पर्यावरणाचे महत्व समजावे म्हणून विद्यार्थी व शिक्षकांनी घोषणा फलकाद्वारे व विविध आरोळ्यातून पर्यावरणाचे व संवर्धनाचे महत्व सर्वांच्या मनावर बिंबवले. यावेळी विकास पाटील, पर्यावरण संवर्धन समिती शाळा विभाग प्रमुख व स्वयंसेवक प्रभाकर मेरुकर, मीनाक्षी मेरुकर, अनघा दिवाकर व सुषमा पाटील, संजीवनी मुळे आदी उपस्थित होत्या.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.