छत्रपती शिवाजी महाराजांमुळे स्वराज्य हे आपले राज्य ही भावना – डॉ. युवराज कदम

एमपीसी न्यूज – इथल्या माती विषयी आत्मियता  आणि निष्ठा स्वराज्याच्या माध्यमातून शिवरायांनी निर्माण केली.  स्वराज्य हे आपले स्वतःचे राज्य आहे, ही भावना छत्रपती शिवाजी महाराजांनी रयतेमध्ये निर्माण केली होती, असे मत डॉ. युवराज कदम यांनी चिखली येथे व्यक्त  केले.

चिखली प्राधिकरण येथे शिवसाई प्रतिष्ठानच्यावतीने तीन दिवसीय शिवसाई व्याख्यानमाला आयोजित केले होते. त्यातील शेवटचे पुष्प डॉ. युवराज कदम यांनी गुंफले त्यावेळी ते स्वराज्याचे मानकरी या विषयावर  बोलत होते.  यावेळी नगरसेविका योगिता नागरगोजे, व्याख्यानमाला समन्वयक राजेंद्र घावटे, शिवसेना विभागप्रमुख पांडुरंग पाटील, अरविंद वाडकर, चंद्रकांत दीक्षित  आदी उपस्थित होते. 

डॉ. युवराज कदम म्हणाले,  आपल्या देशात राहून असहिष्णुतेच्या नावाखाली देशविरोधी कारवाया करणाऱ्यांची संख्या वाढते आहे. अजमल कसाब, याकुब मेमन यासारख्या अतिरेक्यांना पाठिंबा देणारे देशद्रोही शिवशाहीने कधीच खपवून घेतले नसते. शिवाजी महाराजांनी स्वराज्याच्या विरोधात येणाऱ्या आप्तस्वकीयांना देखील माफ न करता कठोर शासन केले. गोहत्याबंदी कायदा करणारा शिवाजी हा जगातला पहिला राजा होता. अठरा पगड जातीतल्या मावळ्यांना घेऊन स्वराज्य निर्माण करणारा आणि स्वतःला राज्याभिषेक करवून घेऊन लोकशाही राज्याची परंपरा निर्माण करणारा जगातील पहिला राजा होय. आजकाल वृद्धांची खूप अवहेलना केली जाते; परंतु ऐंशी वर्षे वयाच्या सोनोपंत डबीर यांची तुला करून महाराजांनी त्यांचा यथायोग्य सन्मान केला होता. शेतीविषयक धोरण राबवून नवीन शेती करणाऱ्याला पाच वर्षे मोफत बी-बियाणे पुरवणारा तसेच त्याचा शेतसारा माफ करणारा शिवबांसारखा राजा कुठे आणि निवडणुकीत कर्जमाफीची आश्वासने देऊन ते न पाळणारे आजचे राज्यकर्ते कुठे? दुराचारी, भ्रष्टाचारी यांना शासन करणारे शिवराय आणि भ्रष्ट मंत्री यांची पाठराखण करणारे आजचे सरकार यातील नैतिक तफावत खूप मोठी आहे. स्वराज्य हे आपले स्वतःचे राज्य आहे, ही भावना छत्रपती शिवाजी महाराजांनी रयतेमध्ये निर्माण केली होती!" 

 कार्यक्रमाचे प्रास्ताविक शैलेश मोरे यांनी केले. तर संतोष गायकवाड यांनी सूत्रसंचालन केले. बाळशीराम फापाळे यांनी आभार मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.