काळेवाडीत वाहनाच्या धडकेत संगणक अभियंत्याचा मृत्यू

एमपीसी न्यूज –  भरधाव अज्ञात वाहनाने जोरात धडक दिल्याने दुचाकीस्वार संगणक अभियंत्याचा जागीच मृत्यू झाला. ही घटना पंधरा दिवसांपूर्वी (दि.3 मार्च) सायंकाळी साडेदहाच्या सुमारास काळेवाडी येथील पुलाजवळ घडली.

विमल चुन्नीलाल भालोडीया (वय 33 रा. पिंपळे सौदागर), असे मृत्यू झालेल्या दुचाकीस्वार संगणक अभियंत्याचे नाव आहे. याप्रकरणी त्याचा मानलेला भाऊ निलेश पाटील (वय 31, रा. दापोडी) याने वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.


                
फिर्यादी निलेश हा संगणक अभियंता आहे. विमल हा त्याचा मानलेला भाऊ होता. विमल संगणक अभियंता होता. हिंजवडी येथील एका खासगी कंपनीत तो नोकरी करत होता. 3 मार्च रोजी सायंकाळी तो कंपनीतून दुचाकीवरून घरी येत असताना काळेवाडी येथे पाठीमागून आलेल्या भरधाव वाहनाने त्याला जोरात ठोकर दिली. त्यात त्याचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर वाहनचालकाने घटनास्थळी न थांबता पोबारा केला.

विमल भालोडीया हा मुळचा गुजरातचा रहिवाशी होता. अपघातानंतर मुतदेह गुजरातला घेऊन गेले होते. त्यामुळे तक्रार देण्यास उशीर झाल्याचे, पोलिसांनी सांगितले. वाकड ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक एस.एस.घोळवे तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.