आळंदी-पद्मावती रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य; भाविक नागरिकांत नाराजी

एमपीसी न्यूज – आळंदी येथील मुख्य नगर प्रदक्षिणासह आळंदी पद्मावती रस्त्याची दुरावस्था झाल्याने प्रचंड खड्ड्यांचे  साम्राज्य पसरले असून भाविकांच्या गैरसोयीत भर पडली आहे. आळंदी नगरपरिषदेने काही प्रमाणात खड्डे बुजविण्याचे काम शहरात हाती घेतले. मात्र, पद्मावती रस्त्यावर विलंब होत असल्याने शालेय मुले, पालक, नागरिक, भाविक देखील नाराजीचा सूर काढत आहे.

येथील मुख्य प्रदक्षिणा मार्गावर डांबरीकरण केल्याने भाविकांनी समाधान व्यक्त केले. मात्र, दुतर्फा बाजूच्या पट्ट्या तशाच राहिल्याने दुतर्फा पावसाचे पाणी साचून भाविक नागरिकांना रहदारीस अडथळा ठरत आहे. दुतर्फा पट्ट्यातील पाणी निचरा व्यवस्था केल्यास दुतर्फा ये-जा करण्यास सोयीचे ठरणार आहे. मात्र, याकडे दुर्लक्ष होत असल्याने नागरिक नाराजी व्यक्त करीत आहेत. फ्रुटवाले धर्मशाळेसह परिसरातील नगरप्रदक्षिणा मार्गावर ठिकठिकाणी पावसाचे पाणी रस्त्यांच्या दुतर्फा साचलेले दिसून येते. याचा निचरा व्यवस्था करण्यासह पद्मावती रस्त्यावर तात्काळ मुरूम टाकून खड्डे भरण्याची मागणी येथील आळंदी जनहित फाऊंडेशनचे अध्यक्ष राजेंद्र घुंडरे पाटील यांनी मुख्याधिकारी समीर भूमकर आणि नगराध्यक्षा वैजयंता उमरगेकर यांच्याकडे केली आहे, असे त्यांनी सांगितले.

नगरप्रदक्षिणा मार्गाचे प्रभावी डांबरीकरण केल्याने आषाढी यात्रा काळात या निर्णयाचे भाविकांनी स्वागत करून पालिका प्रशासनाचे तसेच नगराध्यक्षा वैजयंता उमरगेकर यांचे अभिनंदन केले. यावेळी तत्कालीन माजी आमदार विलास लांडे यांच्या आळंदीतील प्रभावी डांबरीकरणाच्या कामाची नागरिकांना आठवण झाली. नगरप्रदक्षिणा मार्गाप्रमाणेच इतरही मार्गाचे मजबुतीकरण खडीकरण, डांबरीकरण, सिमेंटीकरण तात्काळ हाती घ्यावे, असे आवाहन नागरिकांच्या वतीने करण्यात आले आहे. आळंदीतील विविध रस्त्यावरील खड्डे तात्काळ बुजविण्यात यावेत तसेच रस्ते रहदारीस खड्डेमुक्त ठेवावेत, अशी मागणी आळंदीत जोर धरत आहे.

प्रदक्षिणा मार्गावरून रस्त्याचे दुतर्फा भाविक हरिनाम गजरात नगरप्रदक्षिणा अनवाणी पायाने करीत असतात. मात्र, दुतर्फा बाजूचे रस्ते खराब झाल्याने प्रदक्षिणा देखील मंदावली आहे. येत्या 20 जुलैला आळंदीत आषाढी एकादशी साजरी होत असल्याने त्यापूर्वी नगरप्रदक्षिणा मार्गांच्या साईड पट्ट्याची दुरावस्था दूर व्हावी, अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करीत आहेत. गल्ली- बोळातील अंतर्गत रस्त्यांची अतिशय दयनीय अवस्था झाली असून, पावसामुळे चिखल, राडा-रोडा नागरिकांना गैरसोय निर्माण करीत आहे. यात माउली पार्क, पद्मावती रस्ता आदी ठिकाणांचा समावेश आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.