पुणे महापालिकेच्या सुरक्षारक्षकाला नगरसेवकाकडून टिपऱ्यांचा प्रसाद

एमपीसी न्यूज : पुणे महापालिकेच्या मुख्यसभेत काल, सोमवारी शिवसेना, मनसे आणि राष्ट्रवादीने ढोल वाजवून आंदोलन केले. या वेळीसभागृहात ढोल नेण्यापासून मज्जाव करणाऱ्या सुरक्षा रक्षकांच्या हातावर एका नगरसेवकाने ढोलाची टिपरी मारल्याचा प्रकार घडला. मात्र याप्रकाराबाबत संबंधित सुरक्षारक्षकाने तक्रार करण्यास नकार दिला.

सोमवारी झालेल्या मुख्यसभेत सार्वजनिक गणेशोत्सवाचे शतकोत्तर रौप्य महोत्सवी वर्ष म्हणून महापालिकेच्यावतीने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमातून भाजप आपला ढोल वाजवून घेत आहे असा आरोप करीत काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना आणि मनसेच्या कार्यकर्त्यांनी निषेध म्हणून महापालिकेत ढोल आणले.

हे ढोल छत्रपत्री शिवाजी महाराज सभागृहाजवळ आणले. तथापि सभागृहाच्या प्रवेशद्वारावर तैनात करण्यात आलेल्या सुरक्षारक्षकांनी हे ढोल सभागृहात नेण्याला मज्जाव केला. सुरक्षा रक्षक हे ढोल प्रवेशद्वारामधून आत नेऊ देत नव्हते आणि आतले आंदोलक नगरसेवक ते ढोल आत ओढत होते, असा प्रकार काहीवेळ तेथे सुरू राहिला. सुरक्षारक्षक ढोल आत नेऊ देत नसल्याचे पाहून ढोल वाजवण्याची टिपरी एका नगरसेवकांने सुरक्षा रक्षकांच्या हातावर मारण्याला सुरूवात केली. त्या सुरक्षा रक्षकाने मात्र माननीयांकडून मिळणार मार निमूटपणे सहन केला. या प्रकाराबाबत संबंधित सुरक्षारक्षकाने तक्रार करण्यास नकार दिला. मात्र नगरसेवकाच्या या उद्दामपणाची चर्चा महापालिका वर्तुळात रंगली होती.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.