Motor World : पुण्याच्या अवलियाची 225 छोट्या मोटार मॉडेलची निराळी दुनिया

 एमपीसी न्यूज – विरंगुळा वाटणारेच छंद कधीकधी तुमची ओळख बनवतात. अशीच ओळख पुण्याच्या रत्नाकर जोशी यांची त्यांच्या लहानग्या मोटार गाड्यांमुळे होते.त्यांनी वेगवेगळ्या कार मॉडलचे तब्बल 225 मिनीयेचर म्हणजे लहान प्रतीकृती छंद म्हणून गोळा केल्या आहेत.

त्यांच्या या आगळ्या वेगळ्या छंदाची लिमका बुक ऑफ रेकॉर्ड, गोल्डन बुक ऑफ रेकॉर्ड, इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड, मिराकल बुक ऑफ रेकॉर्ड, असिस्ट बुक ऑफ रेकॉर्ड, अॅमॅझिन बुक ऑफ रेकॉर्ड, एशिया बुक ऑफ रेकॉर्ड, एव्हरेस्ट बुक ऑफ रेकॉर्ड यामध्येही नोंद घेण्यात आली आहे. जोशी हे पुण्याच्या आर.टी.ओ. कार्यालयात नोकरी करत होते. तेंव्हापासूनच त्यांनी हा छंद जोपासायला सुरुवात केली मात्र निवृत्तीनंतर खऱ्या अर्थाने त्यांनी या संग्रहात वाढ केली. आत्तापर्यंत त्यांनी त्यांचा हा खजिना 40 प्रदर्शनाद्वारे नागरिकापर्यंत पोहचवला आहे.

याविषयी बोलताना रत्नाकर जोशी म्हणतात की, मोटारीची किंवा त्यांच्या खेळण्याची आवड ही लहानांपासून वृद्धापर्यंत सर्वांना असते. त्याचप्रमाणे मलाही आहे.मला 1986 साली पहिली मर्सिडीझ बेंझ या गाडीची छोटी प्रतिकृती मिळाली तेव्हापासून मी माझ्या दिवाणखान्यातील पार्किंगच्या जागेत विविध मोटारींच्या प्रतिकृती आणून पार्क करीत आहेत. सध्या माझ्या संग्रहात एकूण 225 मोटारींच्या प्रतिकृती आहेत. त्यामध्ये 175 परदेशी बनावटीच्या तर 50 भारतीय बनावटीच्या प्रतीकृती आहेत. मागील 27 वर्षापासून मी हा छंद अविरतपणे जोपासत आहे.

त्यांच्या या संग्रहात 1923 सालाच्या फोर्ड बनावटीच्या ट्रकपासून सध्याच्या बीएमडब्ल्यूपर्यंतच्या प्रतिकृती आहेत. त्यामध्ये मर्सिडीस बेंझ,फोर्ड,हमर, कूपर,फेरारी,जग्वार,ऑडी इ. परदेशी बनावटीच्या कार तर मारुती, हिंदुस्थान मोटर्स, महिंद्रा, टाटा इ. भारतीय बनावटीच्या कार आहेत. याशिवाय त्यांचेकडे सुझुकी, होंडा, बजाज, डुकाटी इ. च्या दुचाकींच्या प्रतिकृती आहेत.सर्वात मजेची बाब म्हणजे बच्चे कंपनीला आवडणारे रिमोटवर चालणाऱ्या जेसीबी, टॅक्सी, बस व ट्रॅक्टर आहेत. एवढेच नाही तर अगदी खरीखुरी वाटावी अशी बैलगाडी देखील यात सामील आहे. परगावी गेले की गाड्यांच्या शोधात सर्व वेळ घालवतात.

जोशी म्हणाले की, या छंदासाठी अनेकांनी पुढे येऊन मला मदत केली आहे.त्यासाठी अनेकांनी प्रोत्साहन दिले आहे, अवर्जून प्रदर्शन भरविण्यासाठी मला निमंत्रणही येतात, त्यानुसार मी प्रदर्शने भरवतो. इच्छुक शाळा, नागरिक किंवा संस्था मला 9403354611 किंवा 020-24212727 या क्रमांकावर संपर्क साधू शकतात किंवा [email protected] या मेल आयडीवर मेल करू शकतात.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.