Thergaon News: खासदार श्रीरंग बारणे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित महाआरोग्य शिबिराचा 3 हजार लोकांनी घेतला लाभ; 120 जणांवर मोफत शस्त्रक्रिया

एमपीसी न्यूज – मावळ लोकसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे संसदरत्न खासदार श्रीरंग बारणे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित महाआरोग्य तपासणी शिबिराला नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळाला. सुमारे तीन हजार लोकांची तपासणी करण्यात आली. तर, गोरगरिब, गरजू 120 जणांवर संपूर्ण मोफत शस्त्रक्रिया करण्यात आली. पैशांअभावी सहा महिने शस्त्रक्रियेसाठी थांबलेल्या 40 नागरिकांचीही मोफत शस्त्रक्रिया करण्यात आली असून पुढील सहा महिने रुग्णांवर मोफत शस्त्रक्रिया केली जाणार आहे.

एच.पी.पेट्रोल पंप पद्मजी पेपर मिल थेरगाव येथे झालेल्या या महाआरोग्य शिबिराचे खासदार श्रीरंग बारणे यांच्या हस्ते उद्घघाटन झाले. शिबिरात मुंबईतील टाटा मेमोरियल हॉस्पिटलचे सुप्रसिद्ध कर्करोग तज्ज्ञ डॉ. अनुप ताम्हणकर यांच्यासह अनेक नामांकित डॉक्टरांनी रुग्णांची तपासणी केली. अनेकांकडून आरोग्य शिबिराच्या आयोजनात केवळ तपासणी केली जाते. पण, युवा सेना प्रमुख विश्वजीत बारणे यांच्या संकल्पनेतून आयोजित महाआरोग्य शिबिरात कोणाकडूनही एक रुपयाही न घेता संपूर्णपणे मोफत शस्त्रक्रिया करण्यात आली. कोरोना कालावधीनंतर पिंपरी-चिंचवड शहरात सर्वात भव्य असे मोफत महाआरोग्य तपासणी शिबिर घेण्यात आले.

शिबिराचा तब्बल तीन हजार लोकांनी लाभ घेतला. त्यातील गरजू 120 रुग्णांची मोफत शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यामध्ये हृदयाची शस्त्रक्रिया, अपेंडिक्स, हार्णिया, कॅन्सर, मुतखडा, मणक्याच्या शस्त्रक्रिया, प्लास्टिक सर्जरी, हाडांचे फ्रॅक्चर शस्त्रक्रिया, श्वसनलिकेच्या संबंधित शस्त्रक्रिया, मुळव्याध, डोळ्यांचा तिरळेपणा, अंगावरील मोठ्या चरबीच्या गाठींची शस्त्रक्रिया, स्त्रियांच्या गर्भातील गाठींची शस्त्रक्रिया या करण्यात आले. त्यासाठी मुंबईतील 500 बेडचे रुग्णालय आरक्षित केले होते. मुंबईला घेऊन जाऊन शस्त्रक्रिया केली. तर, लोकमान्य, ज्युपिटर हॉस्पिटलमध्येही रुग्णांवर शस्त्रक्रिया करण्यात आल्या.

शिबिरात सहभागी झालेल्यांच्या पुढील सहा महिने मोफत शस्त्रक्रिया केल्या जाणार असल्याचे युवा सेना अधिकारी विश्वजित बारणे यांनी सांगितले. त्याचबरोबर मोतीबिंदूची शस्त्रक्रिया करण्यात आली. 650 जणांना चष्म्याचे वाटप करण्यात आले. 100 बाटल्या रक्त संकलन झाले असेही त्यांनी सांगितले. या शिबिरासाठी रेड स्वस्तिक सोसायटी आणि कर्तव्यम् सोशल फाऊंडेशन यांचे सहकार्य लाभले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.