Lonavala : कार्ला प्राथमिक आरोग्य केंद्रात स्वाईन फ्लू समुपदेशन केंद्र

एमपीसी न्यूज- स्वाईन फ्ल्यू या आजाराबाबत नागरिकांमध्ये जागृती व्हावी या करिता कार्ला प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये स्वाईन फ्लू समुपदेशन केंद्र सुरू करण्यात आले असल्याची माहिती मावळ तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर चंद्रकांत लोहार व कार्ला प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉक्टर भारती पोळ यांनी दिली.

बदलत्या वातावरणामुळे नागरिकांमध्ये थंडी ताप खोकला या प्रकारचे आजार वाढू लागले आहेत. या करिता खासगी रुग्णालयातील डॉक्टर यांची देखील कार्यशाळा घेऊन त्यांना स्वाईन फ्लू या आजाराची माहिती व लक्षणे याबाबत माहिती देण्यात आली आहे. तसेच शाळांमध्ये जाऊन विद्यार्थ्यांची जागृती, ग्रामसभांद्वारे गावोगावी स्वाईन फ्लू या आजाराबाबतची माहिती व जागृती करण्याचे काम सुरू आहे.

कार्ला आरोग्य केंद्रामध्ये टॅमी फ्लूच्या गोळ्या उपलब्ध असून तपासणीकरिता येणाऱ्या रुग्णमध्ये कोणी संशयित आढळल्यास त्यांना सदरच्या गोळ्या दिल्या जात आहेत. ग्रामीण भागासोबतच लोणावळा शहरातील नांगरगाव,भांगरवाडी, खंडाळा या भागांची देखील पाहणी व जागृती मोहीम हाती घेण्यात आली आहे. आरोग्य केंद्रांमध्ये येणाऱ्या सर्व प्रकारच्या रुग्णांना स्वाईन फ्लू समुपदेशन केंद्राच्या माध्यमातून या आजाराबाबतची माहिती लक्षणे व घ्यावयाची काळजी याबाबतची माहिती दिली जात असल्याचे डॉक्टर पोळ यांनी सांगितले. डॉक्टर लोहारे म्हणाले की, कार्ला प्राथमिक आरोग्य केंद्र व खंडाळा उपकेंद्राच्या वतीने परिसरात जनजागृती मोहीम हाती घेण्यात आली आहे.

नगरपरिषदेने स्वच्छतेच्या उपाययोजना कराव्यात – मच्छिंद्र खराडे

लोणावळा शहर व खंडाळा परिसरात मागील काही दिवसांत थंडी तापाच्या आजाराने काही रुग्ण दगावल्याच्या घटना घडल्याने नागरिकांमध्ये भीतीचे व संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. लोणावळा नगर परिषदेच्या वतीने उघडी गटारे व नदी नाल्यांवर औषध पावडरची फवारणी करावी तसेच प्रभागवार परिसराची पाहणी करून कोणी संशयित रुग्ण आढळल्यास त्यांला नगरपरिषद आरोग्य विभाग व तालुका आरोग्य विभागाच्या वतीने तातडीने टॅमी फ्लूच्या गोळ्या सुरू कराव्यात अशी मागणी शिवसेनेचे माजी पुणे जिल्हाप्रमुख मच्छिंद्र खराडे यांनी केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.