Pune : कोकणदिवा एक रोमांचकारी अनुभव

(जयंत रिसबूड)

एमपीसी न्यूज- कोकणदिवा किल्ल्यावरील लेख माझ्या वाचनात आला होता व हा किल्ला बघायची खूप इच्छा होती. तसे आजवर अनेक किल्ल्यांना भेटी दिल्या, व अनेक ट्रेकरूटवर मनसोक्त भटकंती केली. पण कोकणदिवा किल्ला बघायचा योग काही येत नव्हता.आमच्या गिरिकुजन या संस्थेचे मे 2018 महिन्याचे सर्क्युलर हातात पडले व आनंदाने उडीच मारली. 13 मे, 2018 रोजी कोकणदिवा किल्ल्याचा ट्रेक ठरला होता. कोणताही विचार न करता लगेच नांवनोंदणी केली.

सर्वजण पहिल्यांदाच हा किल्ला बघायला निघालो होतो, त्यामुळे कसे जायचे ह्याची कोणालाच कल्पना नव्हती. अर्थात गुगल मॅपवरून रस्ता माहित करून घेतला होता. दि. 13 मे रोजी मंदार महाबळ यांच्या नेतृत्वाखाली तसेच राजेंद्र खैरे, मुकुंद देशपांडे या अनुभवी ट्रेकर्स सोबत आम्ही 10 जणांनी सकाळी 6 वाजता पुणे सोडले. आमचा मार्ग हा पुणे-पानशेत-दापसरे-घोल असा होता. पानशेत धरण ओलांडले व आमचा प्रवास पानशेत धरणाच्या बँक वॉटरच्या काठाने सुरु झाला. सकाळचे 7 वाजले होते व हा रस्ता खूपच निसर्गरम्य होता व खूप उल्हासित वाटत होते.

मजल दरमजल करीत आम्ही घोल या गांवी सकाळी साडेनऊ वाजता पोहोचलो. घोल हे या मार्गावरचे शेवटचे गांव. गावांत विचारपूस केली व आम्हाला असे कळाले की गारजाईवाडी हे कोकणदिवा किल्ल्याच्या पायथ्याचे गांव. घोल ते गारजाईवाडी हे अंतर ४ ते साडेचार किलोमीटर. रस्ता कच्चा असल्यामुळे गाड्या घोल गांवांतच लावल्या व पदयात्रा सुरु केली. सकाळच्या वेळी ताजेतवाने वाटत असल्यामुळे तासाभरात गारजाईवाडीत पोहोचलो. गारजाईवाडी हे अत्यंत टुमदार व स्वच्छ गांव आहे. कोकणात आल्यासारखे वाटले. येथील लोकांचे मुख्य उपजीविकेचे साधन शेती हे आहे. तेथील लोकांशी गप्पा मारल्या तेंव्हा असे कळाले की बहुतेक तरुण मंडळी ही उपजीविकेसाठी पुणे व मुंबईला गेली आहेत. येथे फक्त वृद्ध मंडळीच राहतात. ही खरंच विचार करण्यासारखी गोष्ट आहे.

थोडीशी पोटपूजा केली व पुढे निघालो. आम्ही सर्वजण प्रथमच किल्ल्यावर जात असल्यामुळे गावातील पोळेकर मामांना सोबत घेतले. आमचा मार्ग घनदाट जंगलातून जात होता. मुळीच ऊन लागत नव्हते. खरे तर ही देवराई आहे, म्हणजे देवासाठी राखलेले जंगल. या जंगलातील झाडे कोणीही तोडत नाहीत. वाटेत एक छोटेसे मंदिर लागले.

साधारणपणे एक तासाच्या वाटचालींनंतर आम्ही गडाच्या पायथ्याशी पोहोचलो. अर्ध्या तासाच्या चढाईनंतर आम्ही एका गुहेपाशी पोहोचलो. ऊन लागल्यामुळे आम्ही सर्वच दमलो होतो व तहानही लागली होती. थोडीशी विश्रांती घेऊन व जलप्राशन करून आम्ही गडमाथ्यावर जायला निघालो. वाटेत एक छोटेसे रॉक क्लायंबिंग करावे लागते. गडमाथा खूपच छोटासा आहे. जेमतेम 15 ते 20 माणसे मावतील एवढाच. खरं तर हा एक टेहळणी किल्लाच आहे. गडमाथ्यावरून खूपच नयनरम्य देखावा दिसत होता. समोरच रायगड तर दूरवर लिंगाणा दिसत होता. तळाशी सांडोशी गांव दिसत होते. वातावरण इतके स्वछ होते की असं वाटत होते की रायगड जणूकाही हाकेच्या अंतरावर आहे. थोडावेळ गडमाथ्यावर थांबून उतरायला सुरवात केली. खूप जपून उतरावे लागत होते कारण वाट खूपच घसरडी होती.

अडीच तीनच्या दरम्यान आम्ही गारजाई वाडीत पोहोचलो. आम्ही सर्वच भुकेलेले होतो. बरोबर आणलेल्या जेवणावर अंगतपंगत करत ताव मारला. थोडीशी विश्रांती घेऊन घोल गावकडे प्रयाण केले. सकाळी हाच रस्ता आम्हाला खूप सोपा व सुंदर वाटत होता. पण आता आम्ही खूपच दमलेले होतो त्यामुळे रस्ता काही केल्या संपतच नव्हता. सारखी तहान लागत होती. कसेबसे पाय रेटत आम्ही सुमारे चार वाजता घोल गावात पोहोचलो. दरमजल करत सात वाजता घरी पोहोचलो. आम्ही सर्व दमलेलो होतो पण एक नवीन व सुंदर किल्ला बघितल्याचे समाधान व आनंद प्रत्येकाला वाटत होता. आता थोडेसे ह्या किल्ल्याच्या जवळच असलेल्या कावळ्या बावळ्या खिंडीच्या इतिहासाबद्दल……..

कावळ्या बावळ्याची खिंड

या सह्याद्रीमंडळात अशा अनेक दऱ्या खोऱ्या, खिंडी आहेत की ज्या सामान्य मनुष्यप्राण्यांपासून अनभिज्ञ आहेत. अन तेवढाच अनभिज्ञ आहे तेथे घडलेला इतिहास. काळाच्या पडद्याआड गेलेली अन कागदपत्रांपासून दूर हरवून बसलेली रायगडाच्या उत्तरेस अशीच एक दोन शिंगांसारखी टोके असणारी खिंड आहे. जी आपण रायगडाची चढाई चढत असताना पाठीवर राहते अन जणू भटक्यांस आशीर्वाद देत राहते. ती खिंड म्हणजे कावळ्या बावळ्याची खिंड.

पानशेतहून सह्याद्रीची वाट कोकणदिव्याखालून सांदोशीमार्गे रायगडला जाते ती वाट कावळ्या बावळ्या खिंडीतूनच जाते. ह्या घाटवाटेला कावळ्या घाट असेही संबोधतात. वरंधा घाटाला खेटून असणाऱ्या कावळ्या किल्ल्याशी ह्याचा काहीही संबंध नाही. या घाटाच्या पायथ्याशी असणाऱ्या कौला (कावळा) आणि बौला (बावळा) अशी दोन छोटी गांवे की वस्त्या आहेत व त्यावरून या घाटवाटेला अन खिंडीला कावळ्या बावळ्याची खिंड हे नांव पडले असावे.

तर मित्रांनो, याच खिंडीत ती एक इतिहासाला कलाटणी देणारी घटना घडली. ११ मार्च १६८९ ला शिवपुत्र शंभूराजांचा वडू -तुळापुरी अमानुषत्वचा कळस गाठत औरंगजेबाने वध केला, अन अवघ्या महाराष्ट्रात हाहा:कार उडाला. मोगली सेनेस वाटले की आता उरल्या सुरल्या स्वराज्याचा घास काही दिवसातच गिळून दिल्लीस जाण्याचा मार्ग मोकळा. म्हणूनच औरंगजेबाने आपले निर्णायक फासे थेट राजधानी रायगडच्या दिशेनेच टाकण्यास सुरवात केली. वजीर आसदखानपुत्र ईनिकदखानास रायगडला वेढा देण्यासाठी एप्रिल १६८९ला भला मोठा सेनासागर देऊन पाठवला. तो वेढा नीटसा पडणार आणि राजधानी रायगडावर महाराणी येसूबाईसाहेब, छत्रपती संभूराजे बाळ शिवाजी (शाहू हे औरंगजेबाने कैदेत ठेवलेले नांव ) अन शिवपुत्र राजारामसाहेब यांचे श्वास कोंडणार आणि हे सर्व ईनिकदखानच्या हातात पडणार अशी परिस्थिती निर्माण होत होती.

तोच या वेढ्यास अधिक आवळण्यासाठी आणखी एक मोगली सरदार ईनिकदखानाच्या मदतीस पानशेतहून कावळ्या बावळ्या खिंडीतून रायगडाकडे सरकू लागला. इनिकदखानाने वेढा अजून पुरता टाकला नव्हता, आवळला नव्हता. त्या मोगली सरदाराची खबर सांदोशी गावांतले गोदाजी जगताप व सर्कले नाईक यांना लागली. त्या दोन शूरवीर मराठा शिलेदारांनी त्या मोगली सैन्यास कावळ्या बावळ्याच्या खिंडीत गाठले अन पराक्रमाची शर्थ करीत त्या सैन्यास पुरते कापून काढले. कत्तल होऊन उरलेले सैन्य घेऊन तो सरदार औरंगजेबाकडे आपले काळं तोंड घेऊन परतला. हा इनिकदखानाचा वेढा ठिकसा आवळण्या अगोदरच महाराणी येसूबाईसाहेबांच्या धुरंदर चालीनुसार राजाराम महाराज सपत्नीक आणि इतर थोर मुत्सद्दी महारथींसोबत प्रतापगड-पन्हाळगड-विशाळगड मार्गे किल्ले जिंजीस पोहोचले. जर तो रायगडाचा वेढा पुरता आवळला गेला असता तर …. जर त्या मोगली सरदाराचे सैन्य सरदार गोदाजी जगताप अन सर्कले नाईक ह्यांनी कावळ्या बावल्याच्या खिंडीत कापून काढले नसते तर …… तर आज इतिहास काही औरच असता.

कधीतरी रायगड चढताना थोडेसे पाठमोरे फिरा आणि त्या दोन टोकांच्या कावळ्या बावळ्याच्या खिंडीसही दोन मानाचे मुजरे करा.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.