Chinchwad : पालिका अधिकाऱ्यांकडून गुन्हेगारांचा सन्मान तर हातगाडीवाल्यांचा अपमान – सचिन साठे

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेचे अधिकारी, पुढारी गुन्हेगारांचा सन्मान करतात. तर, पथारी हातगाडीवाल्यांचे नुकसान करुन त्यांचा अपमान करतात. रस्त्यावर, फुटपाथवर, सरकारी जागेवर नगरसेवक व अधिकारी मनमानी प्रमाणे आठवडा बाजाराला परवानगी देतात. उच्च न्यायालयाच्या हॉकर्स झोनच्या निर्मितीच्या आदेशाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत पायमल्ली केली जाते. हा कुठला न्याय ? असा सवाल काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन साठे यांनी उपस्थित केला आहे.

चिंचवड, लिंक रोड येथे काँग्रेसतर्फे घेण्यात आलेल्या पथारी हातगाडी व्यवसायिकांचा मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी हातगाडी, पथारी विंगचे शहराध्यक्ष रमझान अत्तार, उपाध्यक्ष नितीन पटेकर, चिंचवड विभाग अध्यक्ष रोहिदास कुरपे, चिंचवड कार्याध्यक्ष अमोल देवकर यांना साठे यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे असंघटीत कामगार काँग्रेसचे प्रभारी रमेश व्यास, महिला अध्यक्षा गिरीजा कुदळे, घरेलू महिला काँग्रेसच्या शहराध्यक्षा शीतल कोतवाल, माजी नगरसेवक राजाभाऊ गोलांडे, विश्वास गजरमल, युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस मयूर जयस्वाल, अल्पसंख्यांक सेलचे शहराध्यक्ष शहाबुद्दीन शेख, सेवादलाचे शहराध्यक्ष मकर यादव, तारीक सय्यद, चंद्रशेखर यादव, नवनाथ डेंगळे होते.

असंघटीत कामगार विभागाचे शहराध्यक्ष सुंदर कांबळे म्हणाले, “महापालिकेच्या अधिका-यांनी उच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे शहरातील पथारी हातगाड्यांचे सर्वेक्षण करावेत. फोटो पास द्यावा, भोसरी चौक, डांगे चौक, भक्ती शक्ती चौक येथे पूर्व सुचना न देता वारंवार कारवाई केली जाते. ती थांबवावी अन्यथा असंघटीत कामगार काँग्रेसच्या वतीने पुन्हा न्यायालयात जाऊ असा इशारा कांबळे यांनी दिला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.