Pune : ज्येष्ठ नृत्यांगना पंडिता मनीषा साठे यांना ‘सारंग सन्मान’ जाहीर

‘मधुरिता सारंग स्कूल ऑफ परफॉर्मिंग आर्ट्स’ च्या तपपूर्तीनिमित्त पुण्यात कलात्म जल्लोष

एमपीसी न्यूज- ‘मधुरिता सारंग स्कूल ऑफ परफॉर्मिंग आर्ट्स’ चा तपपूर्ती महोत्सव येत्या 6 ते 8 फेब्रवारी या कालावधीत पुण्यात आयोजित करण्यात आला आहे. या तपपूर्ती महोत्सवात तीन दिवसांचा कलात्म जल्लोष, सारंग सन्मान प्रदान, स्मरणिका प्रकाशन आणि कथक नृत्य कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. हे सर्व कार्यक्रम दिनांक 6 ते 8 फेब्रवारी दरम्यान यशवंतराव चव्हाण नाट्यगृह, कोथरुड येथे दररोज सायंकाळी पावणेसात वाजता होणार आहेत. ‘मधुरिता सारंग स्कूल ऑफ परफॉर्मिंग आर्ट्स’ च्या संस्थापक-संचालक प्राचार्या अर्चना संजय यांनी ही माहिती पत्रकाद्वारे दिली.

6 फेब्रुवारी रोजी महोत्सवाच्या पहिल्या दिवशी मनीषा साठे, अर्चना संजय या नृत्यगुरूंच्या संरचना ‘अभिव्यक्ती ‘ या नृत्याविष्कारांतर्गत सादर केल्या जाणार आहेत. प्रख्यात तबलावादक पद्मश्री पं. सुरेश तळवळकर,तसेच पराग करंदीकर (संपादक, महाराष्ट्र टाइम्स ) यांची विशेष उपस्थिती सहा फेब्रुवारीला असणार आहे .

7 फेब्रुवारी रोजी महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी ‘अभिजात ‘ या अविष्कारांतर्गत ‘सारंग सन्मान’ प्रदान समारंभ आणि पंडित राजेंद्र गंगाणी, पंडित योगेश शमसी यांची विशेष प्रस्तुती आयोजित केली आहे. यंदाच्या तपपूर्ती सारंग सन्मानाच्या मानकरी ज्येष्ठ नृत्यांगना पंडिता मनीषा साठे या आहेत. पद्मश्री प्रतापराव पवार (चेअरमन, सकाळ माध्यम समूह) यांच्या हस्ते त्यांना गौरविण्यात येणार आहे.

तपपूर्ती विशेषांकाचे प्रकाशन मुकुंद संगोराम (कलासमीक्षक आणि संपादक, ‘लोकसत्ता’, पुणे) , मुरलीधर मोहोळ (नगरसेवक आणि माजी स्थायी समिती अध्यक्ष ) तपपूर्ती सोहळ्याचे स्वागताध्यक्ष ॲड . शीतल चव्हाण (कायदेतज्ज्ञ आणि अभ्यासक- वक्ते ) यांच्या हस्ते होणार आहे .
8 फेब्रुवारी रोजी ‘अभिनव ‘ या अविष्कारांतर्गत एकल नृत्य प्रस्तुती सादर होणार आहे. त्यात वल्लरी आपटे, सुजाता गावडे, दीक्षा त्रिपाठी, राजश्री घोंगडे, सिद्धी पोटे यांचे नृत्य सादरीकरण होणार आहे. समारोप सोहळ्यास लक्ष्मीकांत देशमुख (माजी अध्यक्ष, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन ), कॅप्टन निलेश गायकवाड (स्वागताध्यक्ष, विश्व मराठी साहित्य संमेलन) आणि दिग्दर्शक संजय सिंगलवार यांची उपस्थिती असणार आहे.

6 ते 8 फेब्रुवारी या तीनही दिवशी नृत्यगुरू अर्चना संजय यांच्या शिष्या कथक नृत्य सादर करणार आहेत. त्यांना चारुदत्त फडके (तबला), समी उल्लाह खान (हार्मोनियम आणि गायन), ,नितीश पुरोहित (सरोद ), रश्मी मोघे (गायन ), तुषार घरत (पखवाज ) संगीत मिश्रा ( सारंगी ) हे साथसंगत करणार आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.