Nigdi : ब्रिटिश अधिकारी असल्याचे भासवून ज्येष्ठ नागरिकाची 29 लाखांची फसवणूक

एमपीसी न्यूज – सोशल मीडियाद्वारे ओळख झालेल्या महिलेने तिचा एक सहकारी ब्रिटिश हाय कमिशन अधिकारी असल्याचे भासवून ज्येष्ठ नागरिकाचा विश्वास संपादन केला. त्याआधारे तिने वेगवेगळ्या कारणांसाठी ज्येष्ठ नागरिकाकडून 29 लाख 4 हजार 500 रुपये बँक खात्यावर टाकण्यास सांगून आर्थिक फसवणूक केली. हा प्रकार यमुनानगर निगडी येथे 30 जून 2018 ते 20 जुलै 2018 या कालावधीत घडला.

नतेसन जयराम (वय 57, रा. यमुनानगर, निगडी) यांनी याप्रकरणी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार ब्रिटिश महिला सुसन जॉन्सन, जॉन हिल्स, इंडियन बँक खातेधारक रीना भाटिया, पंजाब नॅशनल बँक खातेधारक नन्ने बाबू, फिरासत, कॅनरा बँक खातेधारक विजय शर्मा, ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स खातेधारक मिझाजुल खान, पंजाब अँड सिंध बँकेचे खातेधारक गौतम पॉल, अलाहाबाद बँक खातेधारक सुजाता पॉल, युनियन बँक खातेधारक सुभजीत मुजुमदार, युनियन बँक ऑफ इंडियाचे खातेधारक संजय गुप्ता यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 30 जून 2018 ते 20 जुलै 2018 या कालावधीत फिर्यादी जयराम यांची ब्रिटिश महिला सुसन जॉन्सन हिच्याशी फेसबुकच्या माध्यमातून ओळख झाली. त्या महिलेने जॉन हिल्स हा ब्रिटिश हायकमिशनचा अधिकारी असल्याचे भासवून जयराम यांचा विश्वास संपादन केला. त्याआधारे महिलेने वेळोवेळी वेगवेगळी कारणे सांगून जयराम यांना वेगवेगळ्या बँक खात्यांवर पैसे पाठवण्यास सांगितले. त्यातून महिलेने जयराम यांची महिला आणि साथीदारांनी मिळून एकूण 29 लाख 4 हजार 500 रुपयांची फसवणूक केली. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस निरीक्षक (गुन्हे) राजेंद्र निकाळजे तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.