BNR-HDR-TOP-Mobile

Chinchwad: सांडपाण्याचे नाले दोन दिवसात बंद करु, महापालिकेच्या लेखी आश्वासनानंतर उपोषण मागे

थेरगाव सोशल फाऊंडेशनच्या पदाधिका-यांनी सुरु केले होते उपोषण

एमपीसी न्यूज – नाल्यांद्वारे सांडपाणी थेट पवना नदीत सोडले जात असल्याने नदीचे प्रदूषण वाढले आहे. त्यामुळे नदीला मिळणारे सर्व नाले बंद करण्याची मागणी करुनही त्यावर कोणतीही कारवाई केली नसल्याचे निषेधार्थ थेरगाव सोशल फाऊंडेशच्या पदाधिका-यांनी आज (सोमवारी)उपोषणाला सुरुवात करताच महापालिकेला जाग आली. महापालिकेच्या अधिका-यांनी तातडीने उपोषणस्थळी धाव घेत दोन दिवसात सांडपाण्याचे नाले बंद करण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर उपोषण मागे घेण्यात आले. सामाजिक संस्थेच्या पाठपुराव्याला यश आले आहे.

गेल्या काही वर्षांपासून थेरगांव मधील ‘ग’ प्रभाग क्षेत्रिय कार्यालयाच्या कार्यक्षेत्रातील अनेक ठिकाणचे ड्रेनेज लाईन आणि सांडपाणी त्यावर कोणतीही प्रक्रिया न करता थेट नदीपात्रात सोडले जात आहे. नाल्यांद्वारे सांडपाणी थेट पवना नदीत सोडले जात असल्याने नदीचे प्रदूषण वाढले आहे. थेरगाव येथील थेरगाव सोशल फाऊंडेशनच्या पदाधिका-यांनी ‘ग’ क्षेत्रिय कार्यालयाच्या अधिका-यांच्या निदर्शनास ही बाब आणून दिली होती. पंधरा दिवसांपूर्वी अधिका-यांची भेट घेऊन निवेदन दिले होते. त्यांच्यासमवेत पवना नदीची पाहणी केली. त्यावेळी मलनिस्सारण विभागाच्या अधिका-यांनी आठ दिवसात काम करतो, असे आश्वासन दिले होते.

नदीला मिळणारे सर्व नाले बंद करावे अशी मागणी केली होती. परंतु, पंधरा दिवस उलटूनही कोणतीही कारवाई झाली नव्हती. त्याच्या निषेधार्थ आणि नाल्यांमधील सांडपाण्यावर प्रक्रिया करुनच ते नदीमध्ये सोडावे या मागणीसाठी थेरगाव सोशल फाऊंडेशनचे पदाधिकारी आज (सोमवारी)’ग’ प्रभाग क्षेत्रिय कार्यालसमोर लाक्षणिक उपोषणाला बसले होते. त्यानंतर खडबडून जागे झालेल्या महापालिकेच्या जलनि:सारण विभागाच्या अधिका-यांनी उपोषणस्थळी धाव घेतली. पुढील दोन दिवसात सर्व नाले बंद करण्याचे लेखी आश्वासन दिले. त्यानंतर उपोषण मागे घेण्यात आले आहे.

सांडपाणी बंद करण्यासाठी मॅनहोल चेंबर वारंवार दुरुस्त करुनही पाण्याच्या प्रेशरमुळे फुटत आहे. त्याठिकाणी दोन आरसीसीच्या चेंबरचे काम चालू करुन काल पूर्ण केले आहेत. उर्वरित पाणी वळविण्यासाठीचे तुटलेले दोन चेंबर्सचे काम सुरु आहे. उद्या (मंगळवार) दुपारपर्यंत पूर्ण होईल. त्यामुळे नाल्यांमध्ये सांडपाणी येणार नाही, याची खबरदारी घेण्यात येईल, असे पत्र ‘ग’ क्षेत्रीय कार्यालयातील जलनि:सारण विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांनी दिले आहे. तसेच आगामी तीन महिन्यात कायमस्वरुपी तोडगा काढण्याचे आश्वासन देण्यात आले आहे.

HB_POST_END_FTR-A2

Advertisement

Advertisement

You might also like