Vadgaon Maval : स्व. पै. केशवराव ढोरे प्रतिष्ठानच्या सामुदायिक विवाह सोहळ्यात 18 जोडपी विवाहबद्ध

 

एमपीसी न्यूज- वडगाव मावळ येथील स्व.पै.केशवराव ढोरे प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या सामुदायिक विवाह सोहळ्यामध्ये हजारो वऱ्हाडी मंडळींच्या उपस्थितीत 18  जोडप्यांनी आपल्या वैवाहिक जीवनामध्ये प्रवेश केला.

ग्रामदैवत श्री पोटोबा महाराज मंदिरामध्ये आयोजित करण्यात आलेल्या या सोहळ्याचा शुभारंभ प्रतिष्ठानचे अध्यक्ष पंढरीनाथ ढोरे, सचिव गणेश विनोदे, कार्यक्रमप्रमुख अविनाश कुडे, संचालक अजय धडवले, महेश तुमकर यांच्या हस्ते अभिषेक करून करण्यात आली.

साखरपुडा समारंभ जिल्हा बँकेच्या उपाध्यक्षा अर्चना घारे, माजी उपसभापती गणेश ढोरे, देवस्थानचे मुख्य विश्वस्त सोपानराव म्हाळसकर, उपनगराध्यक्षा अर्चना म्हाळसकर राष्ट्रवादीच्या महिलाध्यक्षा सुवर्णा राऊत यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. यानंतर हळदी समारंभ पार पडला व उपस्थित हजारो वऱ्हाडीनी भोजनाचा आस्वाद घेतला. सायंकाळी सर्व नवरदेवांची प्रभात बँडसह भव्य मिरवणूक काढण्यात आली. सायंकाळी विवाह सोहळा संपन्न झाला. विवाह सोहळ्यातील सहभागी प्रत्येक जोडप्याला गॅसजोड, संसारोपयोगी भांडी, पोशाख व वधूंना अलंकार देण्यात आले.

लग्नसमारंभ प्रसंगी डॉ. नेमिचंद बाफना यांना अन्नदाता पुरस्कार व ह.भ.प.मंगलमहाराज जगताप यांना कन्यादान पालकत्व पुरस्कार प्रदान करण्यात आला. आमदार संजय उर्फ बाळा भेगडे, जिल्हा बँकेचे संचालक बाळासाहेब नेवाळे, संत तुकाराम साखर कारखान्याचे उपाध्यक्ष बापूसाहेब भेगडे, राष्ट्रवादीचे निरीक्षक विजय कोलते यांनी वधूवरांना शुभेच्छा दिल्या व ह.भ.प.मंगलमहाराज जगताप यांनी आशीर्वाद दिले. अध्यक्ष पंढरीनाथ ढोरे यांनी प्रास्ताविक केले, सचिव गणेश विनोदे व प्रवीण ढोरे यांनी सूत्रसंचालन केले, तर अतुल राऊत यांनी आभार मानले.

सोहळ्याचे संयोजन पदाधिकारी अविनाश कुडे, सतीश तुमकर, सुनील शिंदे, सुनील दंडेल, सोमनाथ धोंगडे, मंगेश खैरे, अरुण वाघमारे, काशीनाथ भालेराव, विवेक गुरव, राजेश बाफना, अनिल कोद्रे, अविनाश चव्हाण, विलास दंडेल, राजेंद्र वहिले, अर्जुन ढोरे, चंद्रजित वाघमारे, अजय धडवले, राहुल ढोरे, शंकर ढोरे, रोहिदास गराडे, खंडू काकडे, शरद ढोरे, महेंद्र म्हाळसकर, दिनेश ढोरे, नंदकुमार ढोरे, संभाजी येळवंडे, महेश तुमकर, विनय लवंगारे, सतीश गाडे, गणेश झरेकर, मनोज खेंगरे, राजेंद्र म्हाळसकर आदींनी केले.

दिवंगत पै केशवराव ढोरे हे वडगाव ग्रामपंचायतीचे सर्वमान्य सरपंच म्हणून कार्यरत होते. विविध विकासकामे व सामाजिक कामातून समाजाच्या सुख दुःखात सहभागी होऊन सामाजिक बांधिलकी त्यांनी जपली. त्यांचांच वसा आणि वारसा जपत त्यांची ही परंपरा अखंड सुरू राहावी या उद्देशाने स्व.पै. केशवराव ढोरे प्रतिष्ठान या सेवाभावी संस्थेची स्थापना झाली आहे. या संस्थेच्या माध्यमातून अनेक समाजोपयोगी उपक्रम राबविण्यात आले आहेत. केशवराव ढोरे यांचे पुतणे माजी उपसरपंच व प्रतिष्ठानचे अध्यक्ष पंढरीनाथ ढोरे यांनी सर्वांना बरोबर घेत, सर्वांना समान न्याय देत, सदस्य घेऊन उत्कृष्ट कार्य सुरू केले आहे. सहा वर्षात 82 जोडपी विवाहबद्ध झाली. प्रतिष्ठानचे संचालक खंडूजी काकडे यांच्या वतीने सर्व १८ जोडप्याना प्रत्येकी १ आंब्याचे रोपटे भेट देण्यात आले.

गतवर्षी समितीचे अध्यक्ष राजेश बाफना व कार्यक्रमप्रमुख अरुण वाघमारे यांनी सोहळ्यातील ज्या जोडप्याला पहिले कन्यारत्न होईल त्या जोडप्याला ५ हजार रुपये देण्याचे जाहीर केले होते, त्यानुसार एका जोडप्याला कन्यारत्न झाल्याबद्दल 5 हजार रुपयांचा धनादेश सुपूर्द करण्यात आला

कोमल कोकाटे ठरली भाग्यवान वधू

दरम्यान, प्रतिष्ठानच्या वतीने भाग्यवान वधुसाठी लकी ड्रॉ पद्धतीने एक दुचाकी ठेवण्यात आली होती, कोमल कोकाटे ही वधू या गाडीची मानकरी ठरली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.