Nigdi : यशवंतराव चव्हाण स्मारकासाठी महापालिकेने दिले दोन कोटी

एमपीसी न्यूज – यशवंतराव चव्हाण स्मारक समितीतर्फे निगडी, प्राधिकरणात कै. यशवंतराव चव्हाण यांचे भव्य स्मारक बांधण्यात येणार आहे. त्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिका पाच कोटी रुपयांची आर्थिक मदत करणार असून त्यापैकी दोन कोटी रुपयांचा धनादेश मंगळवारी (दि.23) देण्यात आला.

आमदार लक्ष्मण जगताप आणि महापौर राहुल जाधव यांच्या हस्ते समितीच्या पदाधिका-यांकडे धनादेश देण्यात आला. यावेळी सभागृह नेते एकनाथ पवार, स्थायी समिती सभापती विलास मडिगेरी, आयुक्त श्रावण हर्डीकर, टाटा मोटर्स एम्पॉय युनियनचे अध्यक्ष सचिन लांडगे उपस्थित होते.

कै. यशवंतराव चव्हाण स्मारक समिती ही मुंबई सार्वजनिक विश्वस्तव्यवस्था नोंदणीकृत संस्था आहे. या समितीमार्फत पिंपरी महापालिकेच्या हद्दीत निगडी, प्राधिकरण येथे कै. यशवंतराव चव्हाण यांचे भव्य स्मारक बांधण्यात येणार आहे. त्यामध्ये गोर-गरिब, अनाथ व अपंगासाठी अभ्यासिका, वस्तीगृह, सांस्कृतिक भवन, ग्रंथालय व वाचनालय, व्यायामशाळा, आयुर्वेदिक उपचार केंद्र, कॉन्फरन्स हॉल बांधण्याचे नियोजन आहे. त्यासाठी पिंपरी महापालिकेतर्फे आर्थिक मदत केली जाणार आहे.

यशवंतराव चव्हाण यांनी महाराष्ट्रभर राबविलेल्या औद्योगिक धोरणांमुळेच पिंपरी-चिंचवडसह महाराष्ट्र मोठे उद्योगधंदे उभे राहिले. त्यामुळे अल्पावधितच शहराची ओद्योगिकनगरी अशी ओळख देशभरात झाली. पिंपरी-चिंचवड शहर राष्ट्रीय नव्हे तर आंतरराष्ट्रीय स्तरावर नावारुपास आले. यशवंतरावांनी राबविलेल्या औद्योगिक आणि सहकार धोरणांमुळेच लाखो हातांना रोजगार मिळाला.

उद्योगांना चालना मिळाली. व्यापा-यांना व्यापार मिळाला. त्यांचे हेच ऋण फेडण्याचे औचित्य मिळावे. त्यांच्या कार्याची प्रेरणा व स्फूर्ति भावी पिढीतील युवकांना मिळावी. यासाठी त्यांचे महापालिका क्षेत्रात स्मारक असणे गरजेचे आहे. यशवंतराव चव्हाण यांच्या स्मारक शहरात उभे राहण्याकरिता समितीस पाच कोटी रुपयांची मदत केली जाणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.