Pimpri : राष्ट्रवादीत घोळ ; पंधरा दिवसापासून महापालिका विरोधी पक्षनेता निवडीचे भिजत घोंगडे

विरोधी पक्षनेता निवडीवरुन पक्षात दोन गट ?, चिंचवड विरुद्ध भोसरीकरांमध्ये संघर्ष

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेचे विरोधी पक्षनेते तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते दत्ता साने यांनी पदाचा राजीनामा देऊन 15 दिवस उलटले. तरी देखील राष्ट्रवादीचा नवीन गटनेता ठरला नाही. विरोधी पक्षनेतेपद कोणाला द्यायचे यावरुन पक्षात चिंचवड विरुद्ध भोसरी असे दोन गट पडले आहेत. विरोधीपक्षनेते पद भोसरीकडे ठेवा किंवा साने यांनाच मुदतवाढ द्या, असा आग्रह भोसरीकरांनी केला आहे. तर, चिंचवडकरांनी नाना काटे यांचे नाव लावून धरले आहे. यावरुन पक्षात संघर्ष निर्माण झाला असून त्यामुळेच नवीन विरोधी पक्षनेत्याचे नाव लांबणीवर पडत असल्याचे पक्षातील सूत्रांनी सांगितले.

राष्ट्रवादी काँग्रेसने दरवर्षी विरोधी पक्षनेता बदलण्याचा निर्णय घेतला आहे. महापालिकेत 36 नगरसेवक असलेल्या राष्ट्रवादीचा गटनेता विरोधी पक्षनेता आहे. तसेच विरोधी पक्षनेता हा स्मार्ट सिटीचा पदसिद्ध संचालक असतो. त्यामुळे हे पद मानाचे आहे. पहिल्यावर्षी पिंपरी विधानसभा मतदारसंघातील योगेश बहल यांना तर दुस-यावर्षी भोसरी मतदारसंघातील चिखलीचे प्रतिनिधित्व करणारे दत्ता साने यांना विरोधी पक्षनेतेपद देण्यात आली.

एक वर्षाची मुदत संपल्यानंतर साने यांनी मुदतवाढ मागितली होती. परंतु, इतर इच्छुकांनी त्यास विरोध केल्याने पक्षनेतृत्वाच्या सूचनेनुसार साने यांनी 9 जुलै रोजी विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा शहराध्यक्षांकडे दिला आहे. महापौरांनी साने यांचा राजीनामा मंजूर केला नसला. तरी ते दालनातील आपल्या खुर्चीवर बसत नाहीत.

नवीन विरोधी पक्षनेता निवडीवरुन राष्ट्रवादीत चिंचवड विरुद्ध भोसरी असे दोन गट पडल्याचे दिसून येत आहे. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या मेळाव्यात त्याचे पडसाद उमटले होते. भोसरीकरांनी पिंपरी, चिंचवडमधील नेत्यांवर टीकास्त्र सोडले. तर, चिंचवडमधील नेत्यांनी त्यांना प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न केला.

विरोधीपक्षनेते पद भोसरीकडे ठेवा किंवा साने यांनाच मुदतवाढ द्या, असा आग्रह भोसरीकरांनी केला आहे. तर, शहराध्यक्ष आणि चिंचवडकरांनी नाना काटे यांच्यासाठी जोर लावला आहे. नवीन विरोधी पक्षनेता निवडण्यावरुन राष्ट्रवादीत घोळ सुरु असून दोन गट निर्माण झाले आहेत. अजित पवार यांनी देखील पक्षाच्या मेळाव्यात नाव जाहीर करु असे सांगितले होते. परंतु, प्रत्यक्षात मेळावा होऊनही सात दिवस उलटले. तरी देखील नाव जाहीर झाले नाही. त्यामुळे नवीन विरोधी पक्षनेता निवडतात की विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर साने यांनाच मुदतवाढ दिली जाते. याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

याबाबत बोलताना राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे म्हणाले, ”पक्षात कोणतेही मतभेद नाहीत. एक ते दोन दिवसात नवीन विरोधी पक्षनेत्याने नाव निश्चित होईल”.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.