Bhosari : एसपीजी स्कूलमध्ये कृष्ण जन्माष्टमी उत्साहात साजरी
एमपीसी न्यूज- भोसरी येथील एसपीजी स्कूलमध्ये नुकतीच कृष्ण जन्माष्टमी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. शाळेतील बालचमूंनी मोठ्या उत्साहात या सोहळ्यामध्ये सहभाग घेतला.
भारतीय परंपरा आणि आधुनिकता यांचा मेळ साधून शाळेमध्ये दरवर्षी भारतीय सण साजरे केले जातात. अलीकडच्या पिढीला भारतीय परंपरा आणि त्यामागील शास्त्रीय दृष्टिकोन समजावा यासाठी अशा उपक्रमांचे आयोजन केले जाते. यंदा झालेल्या जन्माष्टमी सोहळ्यासाठी ऋग्वेद घुंगुर्डे या पहिलीच्या विद्यार्थ्याने श्रीकृष्णाची वेशभूषा केली होती तर शाळेतील बालचमू गोपाळांच्या वेषभूषेमध्ये शोभून दिसत होते.
कृष्णजन्माच्या निमित्ताने मुलांमध्ये दूध आणि दुग्धजन्य पदार्थांची आवड निर्माण व्हावी हा या सोहळ्यामागील उद्देश होता. शाळेच्या संगीत शिक्षिका चैताली मोकाशी यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी विविध कलागुणांचे सादरीकरण केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले.