Pune Bypoll Election : कसबा पोटनिवडणुकीसाठी भाजपा सहयोगी पक्ष पूर्ण ताकदीने लढणार – चंद्रकांत पाटील

एमपीसी न्यूज : दिवंगत आमदार मुक्ता टिळक यांच्या (Pune Bypoll Election) निधनाने रिक्त झालेली कसबा विधानसभेची पोटनिवडणूक भारतीय जनता पक्ष, बाळासाहेबांची शिवसेना, रिपाइं (आठवले गट), शिवसंग्राम, रासप, रयत क्रांती आदींसह महायुतीतील सर्व घटक पक्ष पूर्ण ताकदीने लढवायचा निर्धार आज करण्यात आला. कसबा विधानसभा पोटनिवडणुकीसाठी भाजपा सहयोगी पक्षांच्या पदाधिकाऱ्यांसह बैठक आज संपन्न झाली.

या बैठकीला पालकमंत्री चंद्रकांत पाटील, प्रदेश सरचिटणीस मुरलीधर मोहोळ, भाजपा पुणे शहर अध्यक्ष जगदीश मुळीक, पुणे शहर संघटन सरचिटणीस राजेश पांडे, बाळासाहेबांची शिवसेनाचे पुणे शहरप्रमुख नाना भानगिरे, प्रदेश सचिव किरण साळी, संपर्कप्रमुख अजय भोसले, लीनाताई पानसरे, पुणे जिल्हा अध्यक्ष रमेश कोंडे, रिपाइं आठवले गट शहराध्यक्ष शैलेंद्र चव्हाण, डॉ. सिद्धार्थ धेंडे, ॲड. मंदार जोशी, बाळासाहेब जानराव, शिवसंग्रामचे भारत लगड, कालिंदी गोडांबे, पतितपावन संघटनेचे स्वप्नील नाईक, राजाभाऊ पाटील, दिनेश भिलारे, मनोज नायर, श्रीकांत शिळीमकर भाजपा नेते शैलेश टिळक, माजी स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने, गणेश बिडकर, धीरज घाटे, प्रदेश प्रवक्ते संदीप खर्डेकर, माजी उपमहापौर सुनीता वाडेकर, भाजपा कसबा मंडल अध्यक्ष प्रमोद कोंढरे, महिला मोर्चा अध्यक्ष अश्विनी पांडे यांच्या सह इतर मान्यवर उपस्थित होते.

बैठकीनंतर पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले की, कसबा विधानसभा मतदारसंघ हा भारतीय जनता पक्षाचा परंपरागत मतदारसंघ आहे. आ. मुक्ताताई टिळक यांच्या निधनाने रिक्त झालेल्या कसबा विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी; यासाठी सर्वांची भूमिका आहे. मात्र, तरीही गाफिल न राहता ही निवडणूक भाजपा, बाळासाहेबांची शिवसेना, रिपाइं (आठवले गट), शिवसंग्राम, रासप, रयत क्रांती यांच्यासह सहयोगी घटक पक्ष सर्वजण पूर्ण ताकदीने लढवणार आहेत.

चंद्रकांत पाटील म्हणाले की, पोटनिवडणुकीसाठी (Pune Bypoll Election) उमेदवारांच्या नावांची घोषणा पक्षाची राष्ट्रीय निवड समिती करेल. त्यामुळे महायुतीच्या सर्व पक्षांचे कार्यकर्ते यासाठी कामाला लागले आहेत. सोमवार दिनांक 6 फेब्रुवारी रोजी दोन्ही मतदारसंघासाठी महायुतीचे उमेदवार आपला उमेदवारी अर्ज दाखल करतील.

बिनविरोध निवडणुकीसंदर्भात विचारले असता पाटील म्हणाले की, कसबा आणि चिंचवड विधानसभा पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी अशी अपेक्षा आहे. त्यासाठी पक्षाच्या नेत्या मधुरा मिसाळ यांनी सर्वच विरोधी पक्षातील प्रमुख नेत्यांशी संपर्क साधला आहे. दोन्ही जागा बिनविरोध करण्यासाठी पत्र देखील पाठवले आहे. त्या पत्रांच्या उत्तराची आम्ही सर्वजण वाट पाहत आहोत. तसेच राज्य स्तरीय नेते देखील सर्व प्रमुख नेत्यांच्या संपर्कात असल्याचे पाटील यांनी यावेळी स्पष्ट केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.