Ravet : त्याने चक्क 80 फूट उंच क्रेनवर चढून वीरू स्टाईल मध्ये केल्या भावना व्यक्त

एमपीसी न्यूज – दुर्धर आजाराने ग्रासल्यामुळे साधी चर्चा करण्यासही कोणी तयार नाही. त्यात लग्नाचे वय होऊन गेले तरीही लग्न जुळत नाही. त्यामुळे मनाची झालेली घुसमट बाहेर काढण्यासाठी त्याने वीरू स्टाईलचा वापर केला. एका 39 वर्षीय कामगाराने चक्क बांधकाम साईटवर लावलेल्या 80 फूट उंच क्रेनवर चढून मनातल्या सगळ्या भावना व्यक्त केल्या. हा प्रकार रावेत येथे शिर्के कन्स्ट्रक्शनच्या साईटवर दुपारी बारा ते दोन या दरम्यान घडला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 39 वर्षीय मजूर नाशिक येथे मजुरीचे काम करतो. तिथून तो पुण्यात त्याच्या लांबच्या नातेवाईकाकडे राहण्यासाठी आला होता. त्याला एचआयव्ही सारखा दुर्धर आजार असल्याने नाशिक मध्ये आणि पुण्यातही त्याच्याशी कोणीही जवळीक साधत नव्हते. त्याच्याशी बोलण्यास देखील कोणी तयार होत नसे. हा आजार त्याला वयाच्या विसाव्या वर्षी जडला.

विसाव्या वर्षापासूनच सगळे नातेवाईक, मित्रमंडळी त्याच्यापासून दूर गेले. त्याच्या भावना तो कुणाशीही शेअर करू शकत नव्हता. त्यात लग्नाचे वय झाले, पण लग्न होत नाही. यामुळे देखील तो अधिक नैराश्याच्या गर्तेत अडकला. त्याच्या या सा-या गोष्टी त्याला कुणाला तरी सांगायच्या होत्या, पण त्याचे कोणी ऐकूनचा घेत नव्हते. त्यामुळे त्याने शोले चित्रपटातील वीरू स्टाईलने आपल्या भावना व्यक्त करण्याचे निश्चित केले. पण पाण्याच्या टाकीऐवजी त्याने बांधकाम साईटवरील क्रेनचा वापर केला. रावेत येथे शिर्के कन्स्ट्रक्शनच्या एका साईटचे काम सुरु आहे. आज हे काम बंद असल्याने त्या साईटवर कोणीही नाही. याचा फायदा घेत त्याने दुपारी बाराच्या सुमारास 80 फूट उंच क्रेनवर चढून त्याच्या भावना व्यक्त केल्या.

दुपारी बाराच्या सुमारास देहूरोड पोलिसांना याबाबत माहिती मिळाली, त्यानुसार पोलीस उपनिरीक्षक संतोष येडे, पोलीस कर्मचारी शाम शिंदे, बाबा सावंत, नवनाथ ननावरे, मीनिनाथ पवार हे घटनास्थळी तात्काळ दाखल झाले. दरम्यान अग्निशमन दलास माहिती देऊन आपत्ती निवारण वाहनास बोलावण्यात आले. त्याच्यासाठी मुलगी शोधून लग्न लावून देण्याचे आश्वासन देत दोन तासाच्या अथक प्रयत्नानंतर क्रेनवर चढलेल्या वीरूला खाली उतरवले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.