Dehu : श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यांसाठी बैलजोडींचा शोध सुरु

एमपीसी न्यूज – जगदगुरु श्री संत तुकाराम महाराजांचा २४ जूनपासून ३३४ वा पालखी सोहळा आयोजित केला आहे. यासाठी पालखी रथ ओढण्यासाठी बैलांचा शोध सुरु आहे. दि. २७ मे ते १ जून या कालावधीत बैलजोडी मालकांनी संस्थानच्या कार्यालयात अर्ज जमा करावेत, असे आवाहन श्री संत तुकाराम महाराज संस्थानतर्फे करण्यात आले आहे.

पालखी सोहळाप्रमुख संजय महाराज मोरे यांनी याबाबत माहिती दिली. पालखी सोहळाप्रमुख काशीनाथ महाराज मोरे यांनी अजिदत महाराज मोरे, संस्थानचे अध्यक्ष मधुकर महाराज मोरे आणि विश्वस्त मंडळाचे माणिकमहाराज मोरे, विशाल महाराज मोरे, संतोष महाराज मोरे आदी उपस्थित होते.

  • देहु येथे २४ जून रोजी श्री संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा पंढरपूरकडे रवाना होणार आहे. देहुगाव ते पंढरपूर दरम्यान वारीनिमित्त समस्त वैष्णव सुमारे २५० कि.मी. पायी प्रवास करतात. या सोहळ्यात परंपरेप्रमाणे पालखी खांद्यावर नेली जात होती. काल परत्वे या प्रथेमध्ये बदल झाला आणि पालखी रथामध्ये घेऊन जाण्याची प्रथा सुरु झाली. या पालखी रथाला सशक्त आणि सुदृढ अशा बैलांची आवश्यकता असल्याने त्यांची वैद्यकीय तपासणीनंतर निवड कऱण्यात येते.

गेल्या काही वर्षापासून पालखी रथ ओढण्याचा मान आमच्याच बैलजोडीला मिळावा, असा हट्ट धरणारे अनेक शेतकरी बांधव असल्याने त्यांची वैद्यकीयदृष्ट्या सशक्त आणि योग्य क्षमतेच्या बैलांची निवड करण्यासाठी संस्थानच्यावतीने अर्ज मागविले आहेत. हे अर्ज व बैलांचा फोटो संस्थानच्या कार्यालयात दि. २७ मे ते १ जून या कालावधीत आणून देण्याचे आवाहन संस्थानच्या वतीने करण्यात आले आहे. आलेल्या अर्जांचा विचार संस्थानच्या वतीने करण्यात येणार नसल्याचे मोरे यांनी सांगितले.

  • पालखी सोहळाप्रमुख काशीनाथ महाराज मोरे यांच्यासह अजित महाराज मोरे यांच्यासह अजित महाराज मोरे, संजय मोरे, संस्थानचे अध्यक्ष मधुकर महाराज मोरे आणि विश्वस्त मंडळ प्रत्यक्ष बैलांचे परीक्षण करणार असल्याचे मोरे यांनी सांगितले. यातून निवडलेल्या बैलजोडीला पालखी रथाला व चौघड्यांच्या गाडीला जुंपण्याचा मान मिळणार आहे. त्यासाठी बैलजो़डी मालकांनी अर्ज करण्याचे आवाहन संस्थानच्या वतीने करण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.