Pune : एटीएम फोडून चोरीच्या प्रयत्नात असलेला चोरटा गजाआड

एमपीसी न्यूज – वडारवाडी येथील दीप बंगलो चौक येथील आदर्श अपार्टमेंटमधील एसबीआयचे एटीएम फोडून चोरीच्या प्रयत्नात असलेल्या चोरट्याला गस्तीवरील पोलिसांनी अटक केली. ही घटना मंगळवारी पहाटे साडेचार ते साडेपाचच्या दरम्यान घडली.

विक्रम विश्वनाथ गोसावी (वय 35, वडारवाडी, पुणे), असे या चोरट्याचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दीप बंगलो चौकात आदर्श अपार्टमेंटमध्ये शॉप नंबर 2 मध्ये एसबीआयचे एटीएम आहे. आरोपी चोरट्याने या एटीएमच्या ठिकाणी सुरक्षारक्षक नसल्याचे पाहून एटीएम सेंटरचे वॉल्टचे वरील कव्हर तोडून, एटीएमचे हूड, हूड असेम्बल, डायलर, एस अँड जी लॉक, प्रेझेंटर मॉडेल तोडून मुख्य केबिन तोडून रोख चोरण्याच्या प्रयत्नात होता.

याचवेळी तेथून पहाटे पोलीस गस्त घालत होते. पोलिसांना संशय आल्याने पोलीस लगेच एटीएममध्ये गेले. यावेळी चोरट्याने पळून जाण्याचा प्रयत्न केला, मात्र पोलिसांनी त्याला पकडून अटक केली. घटनेत एटीएमचे दीड लाखांचे नुकसान झाले आहे.  चतुःश्रूंगी पोलिसात त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.