Pune : विमानतळ विकासासाठी ८०० कोटींचा निधी मंजूर

३५८ कोटींच्या कामाला २० ऑक्टोबरपासून सुरुवात

एमपीसी न्यूज – जगाला जोडणाऱ्या पुण्यातील लोहगाव विमानतळाचे चित्र आता बदलणार असून जगाच्या नकाशावर आलेले लोहगाव विमानतळ आता नजीकच्या दोन वर्षांत कात टाकणार आहे. विमानतळाच्या सध्याच्या इमारतीच्या आवारात आता ४२ हजार स्वेअर मीटर भागात नवी इमारत साकारणार असून त्यासाठी सुमारे ८०० कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे, यापैकी ३५८ कोटी रुपयांच्या कामांना २० ऑक्टोबरपासून सुरुवात होणार असल्याची माहिती पुणे शहराचे खासदार अनिल शिरोळे यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली. विमानतळ संचालक अजय कुमार हे देखील यावेळी उपस्थित होते.

याविषयीची अधिक माहिती देताना शिरोळे म्हणाले की, पुणे विमातळावरून २०१३- १४ मध्ये दरवर्षी ३५ लाख ९६ हजार ६८४ प्रवाशांची ये – जा होत असे. २०१७- १८ मध्ये ही संख्या ८१ लाख ६४ हजार ८४० वर पोचली आहे. विमानांच्या फेऱ्याही ३० हजार ५३४ वरून ५७ हजारांवर पोचल्या आहेत. येत्या दोन वर्षांत पुणे विमानतळावरून दरवर्षी किमान १ कोटी प्रवाशांची वाहतूक होऊ शकेल. तसेच आगामी पाच वर्षात वाढणारी प्रवासी संख्या आणि वाढणाऱ्या विमानांच्या फेऱ्या लक्षात घेता विमानतळ विस्तारीकरण हा शहरासाठी महत्त्वाचा मुद्दा आहे. लोहगाव विमानतळाकडे याआधी २६ एकर जागा होती. त्यानंतर विमानतळाच्या सोईसाठी ही जागा वाढवून मिळावी यासाठी मी सातत्याने पाठपुरावा करीत होतो.

या पाठपुराव्याला यश आले असून संरक्षण मंत्रालयाच्या अखत्यारीत असलेली १६ एकर जागा एप्रिल २०१८ मध्ये विमानतळ प्रशासनाला देण्यात आली आहे. याखेरीज कार्गो पार्किंग, कार्यालयीन व्यवस्था आणि निवासी संकुलासाठी आणखी ३५ एकर जागा मिळावी यासाठी मी राज्य सरकारकडे पाठपुरावा करीत आहे. या प्रयत्नांना यश येऊन विमानतळाला आणखी ३५ एकर जागा मिळेल अशी मला आशा आहे. केंद्रीय मंत्री अरुण जेटली, नितीन गडकरी, मनोहर पर्रीकर यांच्याकडे मी यासंदर्भात सातत्याने पाठपुरावा केला आणि त्यांनीही त्याला मोलाचे सहकार्य केले. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री गिरीश बापट यांचीही साथ या प्रकल्पासाठी मिळाली.

विमानतळ आवारात नवीन इमारत होत असताना प्रवाशांसाठी पायाभूत सुविधाही मोठ्या प्रमाणात निर्माण होतील याकडे आम्ही प्रामुख्याने लक्ष देत आहोत. कार्गो आणि विमान कंपन्यांच्या विमानांसाठी १० एकर जागेचा वापर होणार आहे. पुण्यातील वाढत असलेल्या मालवाहतुकीसाठी स्वतंत्र कार्गो टर्मिनलही याठिकाणी साकारळे जाणार आहे. सीआयएसएफ, विमानतळाच्या कर्मचाऱ्यांच्या निवासाची व्यवस्था काही प्रमाणात येथे होईल. नवी इमारत ४२ हजार चौरस मीटरमध्ये साकारली जाईल. बहुमजली कार पार्किंगच्या जागेचाही त्यात समावेश असेल. विमानांसाठी स्वतंत्र स्टॅंडही होणार आहे. या स्टॅंडची क्षमता नव्या प्रकल्पात वाढणार असल्यामुळे विमान उभे करण्यासाठीच्या विमानतळाला भाडे मिळून उत्पन्नातही भर पडणार असल्याची माहिती यावेळी विमानतळ संचालक अजय कुमार यांनी दिली.

या विमानतळाच्या इमारतीमध्ये सरकते जिने, प्रवाशांसाठी वेटिंग लाऊंज, परवडणाऱ्या दरातील उपहारगृहे उपलब्ध असतील. या विमानतळाला पुण्यातील मेट्रो जोडली जाणार आहे. महामेट्रोकडून त्याबाबतचा प्रकल्प अहवाल तयार करण्याचे काम सुरू आहे. तसेच पीएमपीएमएल, रिक्षा स्टॅंड, कॅब स्टॅंड, टॅक्‍सी स्टॅंड आदी सुविधाही त्यात असतील, असेही कुमार यांनी सांगितले.

विमानतळाच्या धावपट्टीचेही विस्तारीकरण करण्यासाठी सध्या प्रयत्न सुरू असून लवकरच हा प्रश्न देखील मार्गी लागेल असा विश्वास यावेळी खा. अनिल शिरोळे यांनी व्यक्त केला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.