Pune : बर्गर किंगच्या बर्गरमध्ये काचेचे तुकडे, एक जण आयसीयुमध्ये दाखल

डेक्कन पोलीस ठाण्यात बर्गर किंगवर गुन्हा

एमपीसी न्यूज – पुण्यातील एफसी रोडवरील बर्गर किंगच्या आउटलेटमधील बर्गरमध्ये काचेचे तुकडे निघाल्याचे समोर आले आहे. हे बर्गर खाल्ल्याने एका रिक्षावाल्याला थेट आयसीयूमध्ये दाखल करावे लागले. ही घटना बुधवारी (दि.15) घडली. याप्रकरणी डेक्कन जिमखाना पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविण्यात आली. त्यानुसार पोलिसांनी कलम 337 अन्वये बर्गर किंग विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

साजित पठाण असे आयसीयूमध्ये दाखल करण्यात आलेल्या इसमाचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, साजित हे रिक्षा चालक आहे. गेली अनेक दिवस त्यांची त्यांच्या मित्रांसोबत भेट नसल्याने बर्गर किंगमध्ये त्याने मित्रांसाठी पार्टी आयोजित केली होती. त्यानुसार सर्व मित्रांनी बर्गर किंगमध्ये भेटायचे ठरवले. साजितने बर्गर, फ्रेंच फ्राईज, आणि कोल्ड ड्रिंक्स, असे 521 रुपयांचे पदार्थ ऑर्डर केले.

_MPC_DIR_MPU_II

मात्र, ही पार्टी साजितला चांगलीच महागात पडली. बर्गर खाताना साजितला अचानक खोकला येऊ लागला. तो खोकला थांबतच नव्हता तसेच त्याच्या तोंडातून रक्त येऊ लागले. साजितच्या मित्रांनी बर्गर पाहिला असता त्याच्या बर्गरमध्ये काचेचे तुकडे आढळले. या प्रकाराने घाबरलेल्या मित्रांनी साजितला तातडीने सह्याद्री रुग्णालयात दाखल केले. उपचारादरम्यान उलटीवाटे त्याच्या शरीरातून काचेचे तुकडे बाहेर पडल्याचे डॉक्टरांनी सांगितले. आणि पुढील उपचारासाठी त्याला अतिदक्षता विभागात ठेवण्यात आले.

साजितच्या मित्रांनी याप्रकरणी डेक्कन पोलीस ठाण्यात याप्रकरणी तक्रार दिली. तसेच अजय चाकले याने ही घटना मिड-डे या वृत्तपत्राला सांगितली. त्यानंतर हा प्रकार समोर आला. दरम्यान, पोलिसांनी बर्गर किंगवर गुन्हा दाखल केला असून सीसीटीव्हीच्या आधारे तपास सुरू केला आहे. प्राथमिक तपासात बर्गरमध्ये काचेचे तुकडे असल्याची माहिती समोर आली आहे.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक दीपक लगड हे या प्रकरणाचा पुढील तपास करीत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.