Pune : दिव्यांग खेळाडूंना दत्तक घेणे हा एक हृदयस्पर्शी उपक्रम – मुख्‍यमंत्री फडणवीस

एमपीसी न्यूज – क्रीडा क्षेत्रातील दिव्‍यांग खेळाडूंना ग्रॅव्‍हीटी फिटनेस क्लबने दत्तक घेऊन एक चांगला पायंडा पाडला आहे. या खेळाडूंच्‍या करियरला त्‍यामुळे एक नवी दिशा मिळेल, असा विश्‍वास व्‍यक्‍त करुन हा एक हृदयस्पर्शी उपक्रम असल्‍याचे गौरवोद्गार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढले.      

बिबवेवाडी परिसरात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. ग्रॅव्हिटी फीटनेस  क्लबच्या वतीने क्रीडा क्षेत्रातील 21 दिव्यांग व्यक्‍ती दत्तक घेण्यात आल्या असून त्यांचा सत्कार मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते झाला.  यावेळी ज्‍येष्‍ठ विधिज्ञ उज्‍ज्‍वल निकम, माजी राज्यमंत्री दिलीप कांबळे, सुधीर कुलकर्णी, आमदार माधुरी मिसाळ, मिहीर कुलकर्णी, संजय मोरे आदींची उपस्थिती होती.

मुख्‍यमंत्री म्‍हणाले, व्यक्ती शरीराने दिव्यांग नसतो, तो मनाने असतो. तो मनाने दिव्यांग होतो तेव्हाच खरा दिव्यांग असतो. मनात उमेद, उभारी, हिंमत, ताकद असली तर दिव्यांग व्यक्ती कुठल्याही उंचीपर्यंत जाऊ शकतात. स्वामी विवेकानंद यांनी तरुणांना मंदिरात जाण्याऐवजी फुटबॉलच्या मैदानात जाण्याचा सल्ला  होता. स्‍वामी विवेकानंद म्‍हणाले होते, कालीमातेची पूजा करताना ताजी व टवटवीत फुले वापरली जातात, कोमेजलेली फुले आपण वापरत नाही, तसेच मातृभूमीच्‍या स्‍वातंत्र्यासाठी सुदृढ शरीर असलेली तरुणाईच उपयोगी आहे.

चांगले शरीर व चांगले मन ईश्वराला आवडते, तसेच मातृभूमीलाही चांगले मन व चांगले शरीर असलेली तरुणाई आवडते. ग्रॅव्हिटी क्लबने दिव्यांगांना आवश्यक सुविधांनी परिपूर्ण असलेला क्लब खुला केला असून त्याचा फायदा होईल आणि नवीन खेळाडूंची टीम तयार होईल, असा विश्वास मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केला.

ज्येष्ठ विधिज्ञ उज्ज्वल निकम यांनी ग्रॅव्हिटी क्लब आणि त्यांचे प्रमुख मिहीर कुलकर्णी यांचे कौतुक केले. समाजासाठी काहीतरी करावे ही भावना कुलकर्णी यांनी जपली आहे. शारीरिक स्वास्थ्य उत्तम असेल तर मानसिक स्वास्थ्य उत्तम असते. सुदृढ शरीर असलेल्‍या मनात सकारात्मक विचार येतात. आजही मी कोठेही असलो तरी एक तास व्‍यायाम करतो, हे त्‍यांनी आवर्जून सांगितले. शारीरिक संपत्तीचा फायदा होतो, असेही ते म्हणाले.

मिहीर कुलकर्णी यांनी प्रास्‍ताविक केले. माजी राज्यमंत्री दिलीप कांबळे, इंडियन बॉडी बिल्‍डींग अॅण्‍ड फीटनेस असोसिएशनचे संजय मोरे यांची यावेळी शुभेच्‍छापर भाषणे झाली. कार्यक्रमात योगेश मेहेर, प्रतीक मोहिते, सुनील मुलाह, अक्षय शेजवळ, सूर्यकांत दुगावले, जय भवर, अमोल कचरे, नवनाथ भोगडे, प्रियंका कुदळे, रवी वाघ या दिव्‍यांग खेळाडूंचा सत्‍कार करण्‍यात आला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.