Ahmednagar Crime News : बड्या दैनिकाच्या कार्यकारी संपादकाने दिली रेखा जरे यांची सुपारी; पोलीस अधीक्षकांची माहिती

एमपीसी न्यूज – यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे यांच्या खुनाची सुपारी सकाळ दैनिकाच्या नगर आवृत्तीचा कार्यकारी संपादक असलेल्या बाळ बोठे आणि सागर भिंगारदिवे याने दिली. जरे खून प्रकरणात आपले नाव येणार असल्याची कुणकुण लागताच बोठे याने पलायन केले. पोलिसांची पथके बोठे याच्या शोधात रवाना झाली आहेत, अशी माहिती नगरचे पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.

नगर पोलिसांनी रेखा जरे खून प्रकरणात पाच जणांना अटक केली आहे. त्यांच्याकडे तपास केल्यानंतर त्यांना बाळ बोठे आणि सागर भिंगारदिवे या दोघांनी जरे यांच्या खुनाची सुपारी दिल्याची धक्कादायक माहिती उघड झाली आहे.

जरे यांची हत्या करण्यासाठी पाच जणांना सुपारी देण्यात आली. आरोपींनी जरे यांना मारण्यासाठी 24 नोव्हेंबर ही तारीख निश्चित केली. मात्र, 24 नोव्हेंबर या दिवशी आरोपी भरपूर दारू प्यायले. त्यामुळे त्या दिवशी त्यांचा प्लॅन फसला. त्यानंतर त्यांनी 30 नोव्हेंबर ही तारीख निश्चित केली.

जरे या कामानिमित्त नगरहून पुण्याला आल्या होत्या. ऋषिकेश पवार याने जरे यांच्यावर पाळत ठेवली. ऋषिकेश हा मोबाईल फोनवरून आरोपी फारोज शेख आणि ज्ञानेश्वर शिंदे यांच्या संपर्कात होता. पुणे-नगर मार्गावर जातेगाव घाट शिवार येथे जरे आणि आरोपींमध्ये भांडण लागले. त्यावेळी शेख आणि शिंदे या दोघांनी आपल्याला जिचा खून करायचा आहे, ती हीच महिला असल्याचे निश्चित केले आणि जरे यांच्यावर धारदार शस्त्राने वार केले. जरे गतप्राण होऊन रक्ताच्या थारोळ्यात पडल्यांनंतर सर्व आरोपी पसार झाले.

पोलिसांना रेखा जरे यांच्या खून प्रकरणाचा तपास लावण्यात यश आले आहे. पोलिसांनी पाच आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. न्यायालयाने त्या आरोपींना सात डिसेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. नगर पोलीस या प्रकरणाचा मुख्य सूत्रधार असलेल्या बाळ बोठे याच्या मागावर आहेत. पोलीस पथके बोठेच्या शोधात रवाना करण्यात आली असल्याचेही पोलीस अधीक्षक पाटील यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.