Akurdi : पाच नद्यांचे जल घेऊन मावळातील तीन हजार शिवसैनिक पंढरपूर सभेत होणार सहभागी

शिवसेनेची आकुर्डी येथे नियोजन बैठक

एमपीसी न्यूज – शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची 24 डिसेंबर रोजी पंढरपूर येथे जाहीर सभा होणार आहे. या सभेत शिवसेना जोरदार शक्तिप्रदर्शन करणार आहे. सभेसाठी पाच लाख शिवसैनिक जमणार असल्याचे उद्दिष्ट शिवसेनेने ठेवले आहे. मावळ लोकसभा मतदार संघातील तीन हजार शिवसैनिक मावळ आणि पिंपरी-चिंचवड परिसरातून वाहणा-या पाच नद्यांचे जल विठ्ठल चरणी अर्पण करून सभेत सहभागी होणार आहेत. याबाबतची नियोजन बैठक आज (शुक्रवारी) आकुर्डी येथील शिवसेना भवनात झाली.

नियोजन बैठक मावळ लोकसभा मतदार संघाचे खासदार श्रीरंग बारणे, आमदार गौतम चाबुकस्वार यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाप्रमुख गजानन चिंचवडे यांच्या उपस्थितीत पार पडली. जिल्हा संघटिका शादान चौधरी, शहर प्रमुख योगेश बाबर, शहर संघटिका अॅड. उर्मिला काळभोर, विधानसभा प्रमुख प्रमोद कुटे, अनंत को-हाळे, राजू खांडभोर, विधानसभा संघटिका सरिता साने, अनिता तुतारे, शैला खंडागळे आदींनी पुढील कामकाजाचे नियोजन केले आहे.

पिंपरी-चिंचवड आणि मावळ शिवसेना यांच्या वतीने पिंपरी-चिंचवड आणि मावळ मधून वाहणा-या कुंडलिका, आंद्रा, सुधा, इंद्रायणी आणि पवना या पाच नद्यांचे पाणी विठ्ठल चरणी अर्पण करण्यात येणार आहे. त्यासाठी रविवारी (दि. 23) नाणे मावळ उकसान येथील कुंडलिका नदीतीरावर सकाळी आठ वाजता, टाकवे बुद्रुक येथील आंद्रा नदीतीरावर सकाळी नऊ वाजता, आंदरमावळ सुदवडे येथे सुधा नदीतीरावर सकाळी दहा वाजता, देहू येथे इंद्रायणी तीरावर सकाळी अकरा आणि श्री मोरया गोसावी मंदिर येथे दुपारी बारा वाजता विधिवत जलपूजन करून पाच नद्यांचे जल पंढरपूरला नेण्यात येणार आहे. या माध्यमातून बळीराजा संकटातून मुक्त व्हावा, युद्धव ठाकरे यांच्या संकल्पनेतील शिवशाहीचे राज्य यावे यासाठी विठ्ठल चरणी प्रार्थना करण्यात येणार आहे. या विराट सभेत पिंपरी-चिंचवड शहर आणि मावळ मधील तीन हजार शिवसैनिक सहभागी होणार आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.