Akurdi : कवितेतून वाहिली अटलजींनी आदरांजली

एमपीसी न्यूज – ‘अटलजी तुमच्या रुपात हा देश उंच वाटतो, भरल्या मनात या तुम्हा भरून पाहतो…’नंदकुमार मुरडे यांनी अर्पिलेल्या या काव्यपंक्तीमधून माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांना आदरांजली वाहण्यात आली. साहित्य संवर्धन समितीच्या वतीने बिना इंग्लिश स्कुल आकुर्डी येथे काव्यांजली अर्पण करण्यात आली.

भारतीय लष्करातील 1965 आणि 1971 च्या युद्धातील लढवय्ये नायब सुभेदार निवृत्ती यशवंत पानसरे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते तर प्रमुख पाहुणे बिना एज्युकेशन ट्रस्टचे अध्यक्ष इकबालखान होते. बी एस बनसोडे, कवयित्री सविता इंगळे, साहित्य संवर्धन समितीच्या कार्याध्यक्ष शोभा जोशी, अंतरा देशपांडे आदी उपस्थित होते.

निवृत्ती पानसरे म्हणाले, ” सैनिक हाच आमचा धर्म आहे. जात पात, पंथ,यापलीकडे जाऊन एकजुटीने भारतीय जवान सीमेवर डोळ्यात तेल घालून काम करतात म्हणूनच अटलजीसारखे द्रष्टे नेते पोखरणला अणुस्फोट करून आपल्या देशाला बलवान बनवतात”

प्रमुख पाहुणे इकबाल खान म्हणाले की, विरोधकांची मने आपल्या वाणीने जिंकणारा अटलजीसारखा माणूस पुन्हा होणे नाही.

राधाबाई वाघमारे यांनी इकबाल खान यांना राखी बांधली, शोभा जोशी यांनी आय के शेख यांना तर अंतरा देशपांडे यांनी कार्यक्रमाचे अध्यक्ष नायब सुभेदार निवृत्ती पानसरे यांना राखी बांधली.

कवी आय के शेख, डॉ. पी एस अगरवाल, प्रा तुकाराम पाटील, फुलवती जगताप, सुभाष चव्हाण, तानाजी एकोंडे, रघुनाथ पाटील, प्रभाकर चव्हाण, आनंद मुळूक, राधा वाघमारे, बाळासाहेब घस्ते, कैलास भैरट, अरुणा पानसरे, मुरलीधर दळवी, रजनी अहेरराव, माधुरी ओक यांनी अटलजींना कवितेतून आदरांजली समर्पित केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुरेश कंक यांनी केले तर आभार उमेश सणस यांनी मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.