Akurdi News : विधानपरिषद निवडणुकीसाठी पिंपरी चिंचवड परिक्षेत्रातील 52 मतदान केंद्रे सज्ज

एमपीसीन्यूज : उद्या (दि.1 डिसेंबर) रोजी विधानपरिषद शिक्षक व पदवीधर निवडणुकीसाठी मतदान होत आहे. हवेली तालुक्यातील 100 पदवीधर मतदान केंद्रापैकी 43, तसेच 30 शिक्षक मतदान केंद्रापैकी 9 मतदान केंद्रे पिंपरी चिंचवड क्षेत्रात आहेत. अप्पर पिंपरी चिंचवडच्या तहसिलदार गीता गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व मतदान केंद्रे मतदानाकरीता सज्ज करण्यात आली आहेत.

कोरोना पार्श्वभूमीवर यावेळी मतदान केंद्रे फवारुन स्वच्छ करण्यात आलेली आहेत. मतदान केंद्रावर प्रत्येकी दोन आरोग्य कर्मचारी नेमण्यात आले आहेत. पुरुष व महिला मतदारांकरीता स्वतंत्र प्रतिक्षालये उभारण्यात आली असून, रांगेत सामाजिक अंतर राखणेकरीता वर्तुळ आखण्यात आलेली आहेत.

याशिवाय मतदान पत्रिकेवर प्राधान्यक्रम नोंदवण्याकरीता दोन मतदान कक्ष असणार आहेत. मतदारांच्या आरोग्याची पुरेपूर काळजी घेण्याच्या दृष्टीने जय्यत तयारी करण्यात आली आहे. मा. विभागीय आयुक्त व जिल्हाधिकारी तथा सहा.

निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या आदेशाने पिंपळे गुरव येथील माध्यमिक शाळेत आदर्श मतदान केंद्र तयार करण्यात आलेली आहेत. मतदारांना मतदान केंद्र शोधणे सहज शक्य व्हावे याकरीता मतदार सहायता कक्ष स्थापण्यात आलेले आहेत. आज, सोमवारी सर्व पिंपरी चिंचवड क्षेत्रातील ५२ केंद्रावर मतदान पथके पोहचली आहेत.

उद्याच्या मतदानासाठी ही मतदान केंद्र सज्ज करण्यात आली आहेत.

दरम्यान, हवेलीचे उपविभागीय अधिकारी सचिन बारवकर यांनी मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजवावा, असे आवाहन केले आहे. परिविक्षाधीन तहसिलदार विजयकुमार चोबे यांनी मतदारांना आपले मतदार यादीतील नाव शोधणेकरीता http://pune.gov.in तसेच http://103.23.150.139/GTSearch2020/ या संकेतस्थळांचा वापर करण्याचे आवाहन केले आहे. तसेच सर्व मतदान सुरळीत पार पडेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.