Pimpri news: पुणे पदवीधर निवडणूक! महेशदादांच्या पुढाकाराने भाजप उमेदवाराला तब्बल 57 संघटनांचा पाठिंबा

एमपीसी न्यूज – पुणे पदवीधर मतदार संघ निवडणुकीत भाजपविरुद्ध महाविकास आघाडीमध्ये सामना रंगला आहे. अत्यंत चुरशीच्या या लढाईमध्ये भाजप आमदार महेश लांडगे यांनी ‘यार्कर’ टाकला आहे. पुणे आणि पिंपरी- चिंचवड परिसरामध्ये विविध क्षेत्रात काम करणाऱ्या तब्बल 57 संस्था- संघटनांनी भाजपाला लेखी पाठिंबा दिला आहे.

महाराष्ट्रातील राजकारणाच्या दृष्टीने पुणे पदवीधर व शिक्षक मतदार संघाची निवडणूक प्रतिष्ठेची मानली जात आहे. या निवडणुकीत पदवीधर मतदारसंघातून संग्राम देशमुख व शिक्षक मतदारसंघातून जितेंद्र पवार यांना भाजपाने उमेदवारी घोषीत केली आहे.

दरम्यान, पिंपरी-चिंचवड भाजपाचे शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे आणि चिंचवड विधानसभेचे आमदार लक्ष्मण जगताप यांनी उत्कृष्ट नियोजन करून शहरामध्ये सुमारे 27 हजार मतदारांची विक्रमी नोंदणी केली होती. त्याची प्रदेश पातळीवर दखल घेण्यात आली.

_MPC_DIR_MPU_II

निवडणुकीतील चुरस वाढली असतानाच आमदार लांडगे यांच्या पुढाकाराने कला, क्रीडा, सामाजिक, शैक्षणिक आणि वैद्यकीय क्षेत्रासह विविध जाती-धर्मांच्या न्याय्य हक्कांसाठी लढणाऱ्या विविध 57 संस्था- संघटनांनी भाजप उमेदवाराला पाठिंबा दिला आहे. त्यामुळे या निवडणुकीत पिंपरी-चिंचवड भाजपाचे पारडे जड राहील असा विश्वास भाजप पदाधिकारी व्यक्त करीत आहेत.

आमदार लांडगे म्हणाले की, शहरात भाजपा कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी प्रामाणिक काम केले आहे. निवडणूक प्रमुख आणि संघटन सरचिटणीस अमोल थोरात यांनी निवडणूक प्रचार आणि मतदान कार्यपद्धती याचे प्रभावी नियोजन केले आहे. तसेच, चिंचवड विधानसभा मतदार संघात सरचिटणीस मोरेश्वर शेडगे, पिंपरी विधानसभा मतदार संघात सरचिटणीस राजू दुर्गे आणि भोसरी विधानसभा मतदार संघात सरचिटणीस विजय फुगे यांनी सर्व स्तरातील संस्था- संघटनाचे पदाधिकारी यांच्याशी समन्वय ठेवला आहे. त्याचा फायदा या निवडणुकीत होणार आहे.

युवा मतदार निर्णायक भूमिका बाजावतील – आमदार निरंजन डावखरे
निवडणूक निरीक्षक आणि आमदार निरंजन डावखरे म्हणाले की, पिंपरी- चिंचवडमध्ये अत्यंत उत्कृष्ट काम सुरू आहे. पक्षाच्या दोन्ही आमदारांनी विक्रमी मतदार नोंदणी केली आहे. या नोंदणीमध्ये युवा मतदार सर्वाधिक आहेत. त्यामुळे मतदानाचा टक्का वाढणार आहे. युवा मतदार निर्णायक भूमिका बाजावतील. आमदार लांडगे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही पुणे जिल्ह्यात आघाडीवर राहू, असा विश्वास आहे. भाजपा उमेदवारांना पाठिंबा दिलेल्या सर्व संस्था- संघटनाचे मी पक्षाच्या वतीने आभार मानतो, अशी प्रतिक्रिया आमदार डावखरे यांनी दिली.

या संस्था- संघटनांनी दिला पाठिंबा!
यशवंतराव चव्हाण स्मारक समिती, पिंपरी-चिंचवड लघुउद्योजक संघटना, मराठवाडा मित्र मंडळ पिंपरी-चिंचवड शहर, पिंपरी-चिंचवड मुस्लिम महासंघ, मेडिकल असोसिएशन, श्रीक्षेत्र ओरिसा मित्रमंडळ, राजपूत समाज संघटना, विदर्भ मित्र मंडळ, विश्वभारती बंगाली असोसिएशन, सोसायटी फेडरेशन, कोकण विकास मंच, परशुराम सेवा संघ महाराष्ट्र राज्य, कपिलवास्तु बुद्ध विहार समिती, महाराष्ट्र राज्य पदवीधर शिक्षक संघटना, शिवगर्जना कामगार संघटना, स्वाभिमानी श्रमिक कामगार संघटना, अखिल युवा पत्रकार संघ, मावळ असोसिएशन ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, फॅमिली डॉक्टर असोसिएशनसह एकूण 57 संस्था- संघटनांनी भाजपाला लेखी समर्थन दिले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

You might also like