Alandi : ‘त्यांना वारकरी संप्रदायाचा विचारच समजला नाही’; शरद पवार यांचे सडेतोड प्रत्युत्तर

'सच्चा वारकरी अशी भूमिका घेणार नाही'

एमपीसी न्यूज – विठ्ठलाच्या दर्शनाला पंढरीला, माउलीच्या दर्शनाला आळंदीला आणि तुकोबांच्या दर्शनाला देहूला जायचे असेल. तर, कोणाची परवानगी घ्यावी लागत नाही. त्यामुळे कोणी सांगितले की तुम्हाला परवानगी नाही. त्यांना वारकरी संप्रदायाचा विचारच समजला नाही, असे सडेतोड प्रत्युत्तर राष्ट्रवादीचे अध्यक्ष, ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी आळंदीत बोलताना राष्ट्रीय वारकरी परिषदेला दिले. तसेच सच्चा वारकरी अशी भूमिका घेणार नाही, असेही ते म्हणाले.

शरद पवार हे हिंदूविरोधी आहेत. त्यांना वारकऱ्यांच्या कोणत्याही कार्यक्रमाला बोलावू नका, अशा आशयाचे पत्रक पंढरपूर येथे राष्ट्रीय वारकरी परिषदेने प्रसिद्ध केले होते. त्याला शरद पवार यांनी आज शनिवारी आळंदीत जोरदार प्रत्युत्तर दिले. आळंदीमध्ये स्वानंद सुखनिवासी सद्गुरु जोग महाराज पुण्यतिथी शताब्दी महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. या महोत्सवात शरद पवार बोलत होते. यावेळी उत्पादन शुल्कमंत्री दिलीप वळसे पाटील, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा निर्मला पानसरे, आमदार दिलीप मोहिते-पाटील उपस्थित होते.

शरद पवार म्हणाले, “मला हे कधीच समजले नाही. विठ्ठलाच्या दर्शनाला पंढरीला, माउलीच्या दर्शनाला आळंदीला आणि तुकोबांच्या दर्शनाला देहूला जायचे असेल. तर, कोणाची परवानगी घ्यावी लागत नाही. त्यामुळे कोणी सांगितले की तुम्हाला परवानगी नाही. त्यांना वारकरी संप्रदायाचा विचारच समजला नाही. सच्चा वारकरी अशी भूमिका घेणार नाही”

म्हणून त्याकडे मी फारसे लक्ष देत नाही. लहान-सहान गोष्टी होतात. त्याच्याकडे दुर्लक्ष करायचे असते. आपल्याला जो रस्ता पसंद आहे. त्या रस्त्याने प्रामाणिकपणाने जायचे असते. तिथे बांधिलकी ठेवायची असते. त्यामध्ये तडजोड करायची नसते. या भावनेने आज मी याठिकाणी आलो, असेही ते म्हणाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.