Pimpri: सुट्टीच्या दिवशीही कर भरता येणार; कर भरणा करण्याचे पालिकेचे आवाहन 

एमपीसी न्यूज – मिळकतकराची थकबाकीसह पहिल्या सहामाहीची रक्कम भरणा करण्याची 30 सप्टेंबरला मुदत संपत आहे. त्यामुळे नागरिकांच्या सोईच्या दृष्टीने सर्व कर संकलन विभागीय कार्यालयातील भरणा केंद्र 30 सप्टेंबर 2018 अखेरपर्यंत  सार्वजनिक, साप्ताहिक सुट्टीच्या दिवशी सकाळी नऊ ते दुपारी चार या वेळेत सुरु राहणार आहेत, अशी माहिती अतिरिक्त आयुक्त दिलीप गावडे यांनी दिली. तसेच मिळकतधारक, भोगवटा धारकांनी  30 सप्टेंबर अखेर पहिल्या सहामाही अखेरची थकबाकीसह संपूर्ण रक्कम भरुन शास्ती, व्याज रक्कमेची आकारणी टाळावी, असे आवाहनही त्यांनी केले आहे. 

मिळकतकर हा 1 एप्रिल आणि  1 ऑक्टोबर रोजी सुरू होणा-या सहामाही हप्त्याने आगाऊ देय असतो. थकबाकीसह पहिल्या सहामाही अखेर मिळकतकराची रक्कम 30 सप्टेंबर 2018 अखेर व दुस-या सहामाहीची रक्कम 31 डिसेंबर 2018 अखेर भरणे आवश्यक आहे. या मुदतीत मिळकतधारक / भोगवटादार यांनी मिळकतकराचा भरणा केला नाही. तर, थकीत पहिल्या सहामाही अखेरच्या रक्कमेमधील मनपा करावर दरमहा 2% आणि  शासन करावर वार्षिक 10% शास्ती / व्याज रक्कमेची आकारणी 1 ऑक्टोबर 2018 पासून सुरु होणार आहे.

_MPC_DIR_MPU_II

मिळकतधारकांचे सोईच्या दृष्टीने सर्व करसंकलन विभागीय कार्यालये सुट्टीच्या दिवशीही सकाळी नऊ ते दुपारी चार पर्यंत सुरु ठेवण्यात आली आहे. मिळकतधारकांना कराची रक्कम रोख / धनादेश / डिमांड ड्राफ्ट द्वारे भरणा करता येईल. या शिवाय महापालिकेच्या www.pcmcindia.gov.in या संकेतस्थळावर मिळकत कर भरणेकामी ऑनलाईन सुविधा उपलब्ध आहे. मिळकत कराचा ऑनलाईन भरणा करणा-या मिळकतधारकांना सर्वसाधारण (चालू वर्षाचे मागणीतील सामान्य करात) करात 2% सवलत लागू राहील.

महापालिका हद्दीतील सर्व मिळकतधारक / भोगवटादार यांनी 30 सप्टेंबर 2018 अखेर पहिल्या सहामाही अखेरची थकबाकीसह संपूर्ण रक्कम भरुन मनपा कर शास्ती / व्याज रक्कमेची आकारणी टाळावी, असे आवाहन गावडे यांनी केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.