Pimpri : अखिल भारतीय ब्राह्मण महासंघातर्फे ‘नोटा’ न वापरण्याचे मतदारांना आवाहन

एमपीसी न्यूज – राष्ट्राबाबत संवेदनशील असणा-या, खंबीर नेतृत्व असणा-या, देशाला आर्थिक उन्नतीकडे नेणा-या आणि  भ्रष्टाचार विरहित शासन देणा-या पक्षाला आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये मतदान करावे. व्यक्तिगत नाराजी येणा-या पुढील विधानसभा निवडणुकांमध्ये दाखवून देता येईल. त्यासाठी मतदारांनी आपले व्यक्तिगत असमाधान बाजूला सारुन ‘नोटा’ (None Of The Above) हा पर्याय न वापरता आपल्यासमोर उपलब्ध असलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून उमेदवाराला मत द्यावे असे आवाहन अखिल भारतीय  ब्राह्मण महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. गोविंद कुलकर्णी यांनी केले आहे. 

याबाबत प्रसिध्दीसाठी दिलेल्या निवेदनांत त्यांनी म्हटले आहे की, अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाकडून मतदारांनी गुजरात, कर्नाटक, गोवा, मध्यप्रदेश, राजस्थान, छत्तीसगढ येथील विधानसभा निवडणुकीमध्ये नोटा वापरण्याचे आवाहन केले होते. त्याचा विपरित परिणाम दिसून आला होता. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकार आणि विविध राज्य सरकारच्या कार्यप्रणालीवरुन सर्व समाजाला समान न्याय देण्याची प्रक्रिया असमाधानकारक राहिली आहे. सर्वच पक्ष केवळ व्होट बॅंक राजकारण करीत असल्याने आमच्यासमोर योग्य पर्याय नसल्याने अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाने समाज बांधवाना नोटा वापरण्याचे आवाहन केले होते. त्याला काही प्रमाणात प्रतिसाद मिळाल्याने परिणाम वेगळेच दिसून आले.
  • ब्राह्मण समाज केवळ संख्यात्मक दृष्टीने कमी असल्याने या समाजाबरोबर भेदभावाचा व्यवहार करण्यात येतो. म्हणून विविध विधानसभा निवडणुकीमध्ये आम्ही नोटाद्वारे आमची नाराजी व्यक्त केली होती. आता आगामी लोकसभा 2019 च्या निवडणुका राष्ट्राचे भवितव्य ठरविणा-या आहेत. या देशामध्ये आम्ही पूर्णपणे राष्ट्रहित व राष्ट्र कल्याणासाठी  वेळोवेळी त्याग केला. तसेच बलिदानही केले आहे. समाजाच्या व्यक्तीगत नाराजीपेक्षा राष्ट्रसन्मान, राष्ट्र कल्याण व आंतरराष्ट्रीय स्तरावर आपल्या देशाची प्रतिमा उंचावण्यासाठी सुयोग्य सरकार निवडून देणे आवश्यक असल्याने योग्य पक्ष व योग्य उमेदवारांना निवडून दयायचे आहे. आम्ही राष्ट्र व समाजहिताचा विषय आल्यास नेहमीच राष्ट्रहिताला प्राधान्य दिले आहे. राष्ट्रहिताच्या कार्यासाठी आम्ही सदैव त्याग करण्यास तयार आहोत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.